पुण्यात पत्रकार परिषद घेतली म्हणून पीएमपी चालक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

पुणे : पीएमपी प्रशासनातील सेवा ज्येष्ठता, वार्षिक रजा आदींबाबतच्या माहितीसाठी माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याचा वापर केल्याने प्रशासनाने चालकाची बदली केली. त्यासंदर्भात चालकाने पत्रकार परिषद घेतली असता प्रशासनाने त्यास निलंबित केले आहे. वसंत समगिर असे या चालकाचे नाव असून त्यांना नोटीस पाठवून निलंबित करण्यात आले. दरम्यान, सेवा नियम आणि स्थायी आदेशातील तरतुदीनुसार ही कारवाई केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

समगिर हे हडपसर आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी रजा मिळत नसल्याने आगार प्रमुखांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. त्यावर वरिष्ठांनी आगार प्रमुखास अहवाल मागविला होता. त्यामध्ये चालकाला लाईट ड्यूटीची(कमी कष्टाची) सवय, रजा मागणे आणि आरटीआय कायद्याचा वापर करीत असल्याचे नमूद केले. याचा विचार करीत वरिष्ठांनी एकतर्फी निर्णय घेऊन आपली बदली स्वारगेट आगारात केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

समगिर म्हणाले, "आगार प्रमुखाकडून होणाऱ्या अन्यायाबाबत संचालकांकडे तक्रार केली होती. त्यांनी आगारप्रमुखाकडून अहवाल मागवीत माझी स्वारगेट आगारात बदली केली. त्यात माझी बाजू जाणून घेण्यात आली नव्हती. त्यामुळे माझी बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. तर मला निलंबित केले आहे.''

दरम्यान, समगिर यांनी पीएमपी प्रशासनाच्या नियमाचे उल्लंघन करत पत्रकार परिषद घेतली. त्यात प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या पीएमपीच्या सेवा नियम आणि स्थायी आदेशातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करून बडतर्फ का केले जाऊ नये, अशी नोटीस पाठविली आहे, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले.

प्रशासनाच्या नियमाप्रमाणे परवानगी न घेता पत्रकार परिषद घेण्यास पीएमपी कर्मचाऱ्यांना अनुमती नाही. तरी संबंधित चालकाने पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे चालकावर नियमाप्रमाणे निलंबनाची कारवाई करण्यात आली असून खातेअंर्गत त्यांची चौकशी केली जाणार आहे.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP driver suspended for holding press conference in Pune