पीएमपी ई-बस फायद्याची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

रिलॅक्‍स वाटते - शुभांगी 
सध्या निगडी व भेकराईनगर आगारात ई-बसचे चार्जिंग स्टेशन आहे. निगडी-हडपसर व निगडी भोसरी मार्गावर बससेवा सुरू आहे. यातून प्रवास करणारी विद्यार्थिनी शुभांगी म्हणाली, ‘‘मी विश्रांतवाडीला राहायला आहे. निगडीत माझे कॉलेज आहे. भोसरीत मी बस बदलते. भोसरी ते निगडी शक्‍यतो ई-बसने प्रवास करते. बसमध्ये एसी असल्याने थकवा जाणवत नाही. बसचा व बाहेरचा आवाज येत नसल्याने रिलॅक्‍स वाटते. सर्वच मार्गांवर अशा बस असाव्यात.’’

पिंपरी - पर्यावरणपूरक प्रवासीसेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ई-बस दाखल होत आहेत. पहिल्या टप्प्यात ५४२ बस येणार असून टप्प्याटप्प्याने डिझेल बसची संख्या कमी केली जाणार आहे. डिझेल व सीएनजी बसच्या तुलनेत ई-बस कमी खर्चिक, फायद्याच्या व आरामदायी असल्याने प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह लगतच्या सुमारे २५-३० किलोमीटर अंतरापर्यंतच्या ग्रामीण भागातही पीएमपीची सेवा सुरू आहे. परंतु, सध्या ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक असल्याने प्रवाशांना अनेकदा मनस्तापही सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी व प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीने वातानुकुलित व पर्यावरणपूरक ई-बसला प्राधान्य दिले आहे.

त्यानुसार पीएमपीच्या ताफ्यात ५४२ ई-बस दाखल होणार आहेत. त्यापैकी सुमारे ७० बस दाखल झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत ४० बस दाखल होतील. सध्या १०० बसची निर्मिती सुरू आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत उर्वरित बसही दाखल होणार आहेत. यामुळे पीएमपीचा ताफा वाढणार असून बसची कमतरता भरून निघणार आहे. बीआरटी मार्गावर ई-बस सोडण्याचे नियोजन असून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) सर्व बसची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या बसचा लोकार्पण सोहळा शहरात करण्याचे नियोजन आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP E-Bus Advantage