प्रवाशांसाठी लवकरच "पीएमपी ई-कनेक्‍ट' ऍप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

प्रवाशांनी एकदाच पीएमपी ई-कनेक्‍ट हे ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड केले, की कायमस्वरूपी त्यांना ते वापरता येणार आहे. पीएमपीच्या बससेवेची सर्वांगीण माहिती त्यात असेल. या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना पीएमपीचा प्रवास करणे सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. 
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी 

पुणे - शहरातील बस मार्गांच्या वेळापत्रकाची माहिती, हव्या असलेल्या मार्गांवर बस किती वाजता येणार, तिकीट दर किती आहेत, बसथांबे-आगार कुठे आहेत, तेथून बस कोणत्या मार्गांवर धावतात आदी उपयुक्त माहिती प्रवाशांना आता त्यांच्या मोबाईलवर "पीएमपी ई-कनेक्‍ट' या ऍपच्या माध्यमातून मिळणार आहे. येत्या 15 दिवसांत हे ऍप उपलब्ध होणार असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी दिली. 

पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंढे यांनी गुरुवारी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी संपादकीय सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत पीएमपीची आगामी वाटचाल कशी असेल, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्याचा मानस आहे, त्या दिशेने कोणते प्रयत्न सुरू आहेत आदींबाबत सूतोवाच केले. पीएमपीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रवासी केंद्रित निर्णय प्रक्रिया राबविणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. "सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी त्यांचे स्वागत केले, तर कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी प्रास्ताविक केले. 

शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीची प्रवासी संख्या मोठी आहे. वेळापत्रकानुसार बससेवा, स्वच्छता, बसची चांगली अवस्था असेल, तर दुरावलेले प्रवासी पुन्हा पीएमपीकडे वळू शकतील. त्यासाठी फारशा खर्चिक उपाययोजनांची गरज नाही, तर असलेल्या साधनसामग्रीतूनही आणखी सुविधा प्रवाशांना पुरविणे शक्‍य आहे आणि त्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत, असे मुंढे यांनी सांगितले. 

धकाधकीच्या सध्याच्या जीवनात प्रवाशांसाठी वेळ महत्त्वाचा आहे. त्यासाठी वेळेवर धावणारी बससेवा हवी. घरापासून जवळच्या बसथांब्यावर बस किती वाजता येणार आहे, याची माहिती प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर मिळाली, तर ते नक्कीच बससेवेचा वापर करतील, हे लक्षात घेऊन "पीएमपी ई-कनेक्‍ट' हे ऍप्लिकेशन सध्या तयार करण्यात येत आहे. प्रवाशांना पीएमपीबाबत काही माहिती हवी असेल, तर तीदेखील त्यांना प्रश्‍न-उत्तराच्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकेल. बसमधून प्रवास करतानाही त्यांना ऍपच्या माध्यमातून संदेश देवाण-घेवाण करता येईल, असे या ऍपचे स्वरूप असणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: PMP e-connected app soon for passenger