पीएमपीचे ई-नियोजन

मंगेश कोळपकर
मंगळवार, 23 मे 2017

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील १३ आगारे ई-तिकिटिंगद्वारे जोडण्याचा पीएमपीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे सर्व आगारप्रमुख एका क्‍लिकवर मार्गावरील बसमधील प्रवासीसंख्येचा आढावा घेऊ शकतील. प्रवासीसंख्येनुसार वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन करणेही शक्‍य होणार आहे. प्रवाशाला तिकीट दिल्यापासून ते वाहकाने रोकड जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करणारी पीएमपी ही देशातील पहिली सार्वजनिक परिवहन संस्था असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील १३ आगारे ई-तिकिटिंगद्वारे जोडण्याचा पीएमपीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे सर्व आगारप्रमुख एका क्‍लिकवर मार्गावरील बसमधील प्रवासीसंख्येचा आढावा घेऊ शकतील. प्रवासीसंख्येनुसार वेळापत्रक ठरविण्याचे नियोजन करणेही शक्‍य होणार आहे. प्रवाशाला तिकीट दिल्यापासून ते वाहकाने रोकड जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करणारी पीएमपी ही देशातील पहिली सार्वजनिक परिवहन संस्था असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

प्रवाशाला ई-तिकीट देण्याचा प्रकल्प गेल्या दीड वर्षांपासून पीएमपीमध्ये सुरू होता. पहिल्या टप्प्यात प्रत्येक आगारांतील मार्गांवर प्रवाशांना ई-तिकिटे देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात आगारे परस्परांना जोडण्यात आली असून, आता शेवटच्या टप्प्यात बस मार्गांवर संबंधित आगारप्रमुखांना लक्ष ठेवणे शक्‍य झाले आहे. मार्गावर बस नेण्याची वेळ, वाहकाने मार्गावर तिकिटे देण्यास सुरवात केल्याची वेळ, कोणत्या स्थानकावरून किती प्रवासी बसमध्ये बसले, त्यांना किती रकमेची तिकिटे देण्यात आली, कोणत्या फेरीत सर्वाधिक उत्पन्न मिळाले, अपेक्षित उत्पन्न आणि मिळालेले उत्पन्न आदींची माहिती आता प्रत्येक आगारात एका क्‍लिकवर उपलब्ध झाली आहे. एखादी बस वेळापत्रकानुसार धावली नाही तर, कारवाई करण्याचे अधिकारही आगारप्रमुखांना देण्यात आले आहेत. 

ई-तिकीट यंत्रणा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठीच्या संस्थेची निवड तत्कालीन पीएमपीचे अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांनी केली होती. या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर डॉ. परदेशी यांची बदली झाली. त्यानंतर प्रकल्पाचे काम रेंगाळले होते. मात्र, अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर तुकाराम मुंढे यांनी ही यंत्रणा कार्यान्वित व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार अनेक चाचण्यांनंतर गेल्या आठवड्यात या यंत्रणेचे काम सुरू झाले आहे. दोन्ही शहरांत प्रवाशांची वाहतूक किती झाली, उत्पन्न किती मिळाले, दैनिक पास किती विकले गेले आदींचा आढावा वाहतूक महाव्यवस्थापक, सहव्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आदी वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यालयातून दररोज घेऊ लागले आहेत. 

सात मार्गांचे सुसूत्रीकरण 
ई- तिकीट यंत्रणेमुळे कोणत्या वेळी कोणत्या स्थानकावर प्रवाशांची संख्या जास्त असते, याचा आढावा प्रशासनाला मिळू लागला आहे. यापूर्वी त्याचे काम आगारनिहाय होत असे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नियोजनासाठी सहा कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. त्यातून प्रवासीसंख्येनुसार, मार्गावर उत्पन्नानुसार बस आणि बससंख्येचे नियोजन करण्यात येऊ लागले आहे. हिंजवडी, वाकड, माण परिसरातील सात मार्गांचे पाच दिवसांपूर्वी सुसूत्रीकरण करण्यात आले असून त्यावरील सुमारे २७० फेऱ्यांचे नेमके नियोजन झाले आहे. त्यामुळे प्रवाशांनाही सुविधा मिळू लागली आहे. 

बस-प्रवाशांचा ताळमेळ
पीएमपीचे दोन महिन्यांपूर्वी सुमारे ३७५ मार्ग होते, त्यातील अनेक मार्गांवर पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे ते तोट्यात सुरू होते, तर काही मार्गांवर प्रवासी संख्या असतानाही बस उपलब्ध होत नव्हत्या. परिणामी पीएमपीचा तोटा वाढत होता. ई-तिकीट यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर तोट्यातील मार्गांचा टप्प्याटप्प्याने आढावा घेण्यात आला. कोणत्याही मार्गावरील बससेवा बंद न करता त्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मार्गांची संख्या आता ३१४ झाली आहे. या बदलामुळे महापालिका हद्दीबाहेरचा भाग, उपनगरे आणि शहराचा मध्यभाग, यांना जोडणाऱ्या बसच्या फेऱ्यांत वाढ झाली आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.   
 

१२५ कर्मचाऱ्यांना पर्यायी काम

वाहकांनी तिकिटे किती दिली, त्याची रोकड किती, टप्पेनिहाय प्रवासी आणि तिकिटांचा हिशेब, रोकड व्यवस्थापन, त्याचे अहवाल तयार करणे आदी कामांसाठी प्रत्येक आगारात पीएमपीचे ५-६ कर्मचारी कार्यरत होते. ई-तिकीटचा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे आता १२५ कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. त्यातील काही जणांना वाहक-चालक म्हणून मार्गांवर पाठविण्यात आले आहे तर, प्रशासनाच्या आवश्‍यकतेनुसार अन्य कामांसाठी कर्मचारी आता उपलब्ध झाले आहेत. तसेच ई-तिकीट यंत्रणेमुळे हिशेब व्यवस्थापनात अचूकता आली आहे.

Web Title: pmp e-management