पंचावन्न कोटी पाण्यात?

pmp bus
pmp bus

पुणे - "पीएमपी'च्या ताफ्यात आधुनिक ई-बस, सीएनजीवर धावणाऱ्या नव्या बस दाखल होत असल्या, तरी या बसमध्ये पुढील थांब्याची माहिती देणारी "इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम' (आयटीएमएस) यंत्रणा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शहर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये धावणाऱ्या नव्या, जुन्या बसमधील "आयटीएमएस'ची यंत्रणा केवळ शोभेची ठरली आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही त्याचा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. 

प्रवाशांना प्रवास करताना बसमध्येच पुढील थांबा कोणता असेल, बस कोणत्या थांब्यावर थांबत आहे, याची माहिती बसमध्येच देणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच बस कोणत्या मार्गावरून किती वेगाने धावत आहे, त्यात प्रवासी किती आहेत, चालकाने बस कोणत्या थांब्यावर थांबविली, कोणते थांबे वगळले आदींची माहिती "आयटीएमएस'मध्ये मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी "पीएमपी'च्या सुमारे दोन हजार बसमध्ये "जीपीएस' यंत्रणा बसविण्यात आली. ही यंत्रणा मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आली आहे. 

या यंत्रणेमुळे कोणत्या मार्गावरील कोणत्या बसमध्ये किती प्रवासी होते, बसच्या एका फेरीचे उत्पन्न किती होते आदी घटकांची माहिती एका "क्‍लिक'वर उपलब्ध होणार होती. त्यानुसार "पीएमपी'ला बसच्या वाहतुकीचे नियोजन करता येईल, असे अपेक्षित होते. "आयटीएमएस'साठी दोन्ही महापालिकांनी मिळून पीएमपीला सुमारे 52 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी ही योजना सुरू झाली. सुरुवातीला काही दिवस यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ती पुन्हा बंद पडली आहे. 

नव्या बसमध्येही रडकथा कायम 
"पीएमपी'च्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या 400 बस दाखल झाल्या आहेत. तसेच डिझेलच्याही सुमारे 200 बस गेल्या दोन वर्षांत दाखल झाल्या आहेत. मात्र या बसमधील "आयटीएमएस' यंत्रणा आणि पीएमपीच्या "आयटीएमएस'च्या नियंत्रण कक्षाची यंत्रणा यांच्यात एकात्मिकता साधली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पीएमपी आणि बस उत्पादक कंपन्या यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू असली, तरी अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही, तर जुन्या बसमधील जीपीएस यंत्रणाही फारशी कार्यान्वित नसल्याचे वास्तव आहे. 

यंत्रणा केव्हा होणार कार्यान्वित? 
याविषयी "पीएमपी' प्रशानसाकडे विचारणा केली असता, जुन्या बसच्या "जीपीएस' आणि "आयटीएमएस'चे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी याबाबत चर्चा सुरू आहे. त्यांना ही यंत्रणा कार्यान्वित करण्यास वारंवार सांगण्यात आले आहे. तर नव्या बसबाबत उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र "आयटीएमएस' यंत्रणा नेमकी केव्हा कार्यान्वित होणार, याबद्दल त्यांना ठोस उत्तर देण्यात आले नाही. 

"आयटीएमएस' यंत्रणेसाठी दोन्ही महापालिकांनी 52 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याचा नेमका "पीएमपी'ला काय फायदा झाला? खरे तर ही यंत्रणा प्रवाशांसाठी उपयुक्त आहे. परंतु लोकप्रतिनिधींना फक्त खरेदीचीच हौस असते, हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 
- संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com