पीएमपीला हवीत 3 स्थानके 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

पुणे - मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबसाठी जागा देण्याच्या मोबदल्यात पीएमपी प्रशासनाला त्याच परिसरात तीन स्थानके उभारून हवी आहेत. त्यानंतरच स्थानकाची जागा हस्तांतरित करण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट शब्दांत महामेट्रोला कळविले आहे. नव्या जागांचे विकसन होऊन त्या पीएमपीच्या ताब्यात येण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी चिन्हे आहेत. 

पुणे - मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबसाठी जागा देण्याच्या मोबदल्यात पीएमपी प्रशासनाला त्याच परिसरात तीन स्थानके उभारून हवी आहेत. त्यानंतरच स्थानकाची जागा हस्तांतरित करण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट शब्दांत महामेट्रोला कळविले आहे. नव्या जागांचे विकसन होऊन त्या पीएमपीच्या ताब्यात येण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, अशी चिन्हे आहेत. 

जेधे चौकात मेट्रोचे बहुमजली भूमिगत स्थानक होणार आहे. त्यामुळे स्वारगेटवरील पीएमपीच्या स्थानकाचे स्थलांतर करावे लागणार आहे. पीएमपीची प्रशासकीय कार्यालयांची इमारत आणि पीएमपीच्या मालकीची प्राप्तिकर विभागाचे सध्या कार्यालय असलेल्या इमारतीची जागाही ट्रान्स्पोर्ट हबसाठी मोकळी करून द्यावी लागणार आहे. या साडेचार एकर जागेच्या मोबदल्यात पीएमपीने तीन जागा मागितल्या आहेत. या जागांबरोबरच तेथे स्थानक म्हणून सपाटीकरण करून द्यावे, अशी मागणी करीत केबिन, प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृहे, उपाहारगृहे, शेड्‌स आदी सुविधांचीही आवश्‍यकता असल्याचे पीएमपीने म्हटले आहे. पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे, संचालक सिद्धार्थ शिरोळे यांच्या चर्चेनंतर तीन जागांचा प्रस्ताव पीएमपीने महामेट्रोला तीन दिवसांपूर्वी सादर केला आहे. या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून त्या घेऊन त्यांचे विकसन करून पीएमपीच्या ताब्यात द्यायच्या आहेत. त्यासाठी सुमारे दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असा पीएमपी प्रशासनाचा अंदाज आहे. ट्रान्स्पोर्ट हब सुमारे 20 एकर जागेत जेधे चौकात साकारणार आहे. जमिनीखाली पाच मजली, तर त्यावर सुमारे 20 मजले होणार आहेत. 

स्वारगेटला महापालिकेकडून मिळालेल्या जागेत मेट्रो स्थानकाच्या कामाला येत्या दोन दिवसांत प्रारंभ होईल, असे महामेट्रोचे संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. 

महापालिका स्थानकाचाही प्रश्‍न कायम 
महापालिका भवन इमारतीमागे मेट्रोचे स्थानक येणार आहे. त्यामुळे तेथील बसस्थानकाचेही स्थलांतर करावे लागणार आहे. हे स्थानक शिवाजीनगर धान्य गोदामाममध्ये हलवावे, असे महामेट्रोने सुचविले होते. परंतु, ते शक्‍य नसल्याचे पीएमपीने म्हटले आहे. त्यामुळे आता महापालिका स्थानकासाठीही महामेट्रो जागा शोधत आहे. 

स्वारगेट आणि महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकांना पर्यायी जागा देण्याबाबत येत्या दोन दिवसांत बैठक होणार आहे. पीएमपी आणि महापालिकेचे अधिकारीही त्या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकीतून पर्यायी जागांचा प्रश्‍न नक्की सुटेल. 
रामनाथ सुब्रह्मण्यम, संचालक, महामेट्रो 

पीएमपीला हव्या असलेल्या जागा 
स्वारगेट मासळी बाजारामागे - 5 हजार चौरस मीटर 
स्वारगेट जलतरण तलावाजवळ - 10 हजार चौरस मीटर 
एसटी स्टॅंडजवळ - 9 हजार चौरस मीटर 

Web Title: PMP needs 3 stations