नव्या बस कोठे उभ्या करायच्या?

मंगेश कोळपकर
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात वर्षात सुमारे ९९० नव्या बस दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, बस उभ्या करण्यासाठी पीएमपीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे नव्या बस कोठे उभ्या करायच्या, याबाबत प्रश्‍न निर्माण होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यात पीएमपीसाठी आरक्षित असलेले भूखंड दोन्ही महापालिकांनी संपादित करून, पीएमपीच्या ताब्यात दिले तर, हा प्रश्‍न सुटू शकतो. मात्र, खरेदीसाठी उत्साही असणारे सत्ताधारी आता भूखंड ताब्यात घेण्यासाठी तत्परता दाखविणार का, हा प्रश्‍न आहे.

पीएमपीच्या ताफ्यात सध्या सुमारे २ हजार बस आहेत. त्यातील सुमारे १५०० बस रोज सुमारे ३०० मार्गांवर धावतात. मार्केट यार्ड, नरवीर तानाजीवाडी, खडकी बाजार, कोथरूड, विश्रांतवाडी, पिंपरी (संत तुकाराम नगर), निगडी आदी आगारांमध्ये पुरेशी जागा नसल्यामुळे बस रात्री रस्त्यांवर उभ्या राहतात. 

पीएमपीचे सुरक्षारक्षक असले तरी त्यांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे बसमधून सुट्या भागांची चोरी होण्याच्या घटना वारंवार होतात; तसेच भिक्षेकरीही रात्री या बसचा वापर करतात, असेही दिसून आले.या पार्श्‍वभूमीवर पीएमपीच्या ताफ्यात ९९० बस अजून एक वर्षात दाखल होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

नव्या बस येणार म्हणून पीएमपी प्रशासनाने दोन्ही महापालिकांकडे जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने कोथरूड, सुतारवाडी, बाणेरमधील; तर पिंपरी- चिंचवड महापालिकेने डुडुळगाव, चऱ्होली आदी जागा नुकत्याच पीएमपीच्या ताब्यात दिल्या आहेत; तसेच दोन्ही महापालिकांनी यापूर्वीच जकात नाक्‍यांच्या जागाही पीएमपीला उपलब्ध करून दिल्या आहेत. आता उर्वरित जागांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वेगाने पावले टाकण्याची गरज आहे. 

याबाबत पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे म्हणाल्या, की पीएमआरडीए आणि पीसीएनडीटीएकडून पीएमपीला जागा मिळण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही महापालिकांकडेही पाठपुरावा सुरू आहे.

पीएमपीचे  संचालक सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘आगारे विकसित करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देण्याची तत्त्वतः तयारी दर्शविली आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.’’

Web Title: PMP New Bus Place