प्रयोग खासगीकरणाचा... भुर्दंड पीएमपी अन्‌ प्रवाशांना

मंगेश कोळपकर
बुधवार, 11 जुलै 2018

पुणे - कोथरूड आणि वडगाव शेरीतून पीएमपीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो, तुमच्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आता खासगी बससेवेच्या प्रयोगासाठी पावले उचलली आहेत. त्यातून तुमच्या खिशाला तर अप्रत्यक्ष झळ बसणार आहेच; पण त्याच वेळी फायद्याच्या मार्गावर प्रयोग केल्याने पीएमपीलाही आर्थिक भुर्दंड बसणार आहे. 

पुणे - कोथरूड आणि वडगाव शेरीतून पीएमपीने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो, तुमच्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आता खासगी बससेवेच्या प्रयोगासाठी पावले उचलली आहेत. त्यातून तुमच्या खिशाला तर अप्रत्यक्ष झळ बसणार आहेच; पण त्याच वेळी फायद्याच्या मार्गावर प्रयोग केल्याने पीएमपीलाही आर्थिक भुर्दंड बसणार आहे. 

पुणे स्टेशन ते कोथरूड आणि कोथरूड- पुणे स्टेशन, स्वारगेट- कोथरूड आणि कोथरूड- स्वारगेट, पुणे स्टेशन ते वडगाव शेरी आणि वडगाव शेरी- पुणे स्टेशन हे पीएमपीला सर्वाधिक उत्पन्न देणारे मार्ग आहेत. याच तीन मार्गांचे प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी ३० एसी मिनी बसव्दारे खासगीकरण करण्याचा प्रस्ताव फोर्स कंपनीने भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यामार्फत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सादर केला आहे. 

प्रस्तावाचा पीएमपी करणार अभ्यास
या प्रस्तावाबाबत आयुक्तांनी दोन बैठका घेतल्या. परंतु, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. प्रवासी वाहतुकीचा प्रस्ताव सादर झाल्यावर त्याचा अभ्यास करून पीएमपी अभिप्राय सादर करणार आहे. 

हा प्रस्ताव खासगी कंपनीच्याच फायद्याचा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. गर्दीच्या तीन मार्गांचे खासगीकरण केल्यास आर्थिक फटका बसण्याची शक्‍यता पीएमपीच्या वर्तुळातून व्यक्त होत आहे.

कोणत्याही प्रकारची गुंतवणूक न करता नागरिकांना वेळेत आणि हमखास बससेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी फोर्स कंपनीचा प्रस्ताव पीएमपीसाठी फायदेशीर ठरेल. हा प्रस्ताव व्यक्तिगत स्वरूपाचा नाही, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठीचा प्रयत्न आहे. हा प्रस्ताव समजून घ्यावा आणि त्याबाबत सूचना केल्या, तर त्याचा स्वीकार आम्ही नक्कीच करू. 
- योगेश गोगावले, शहराध्यक्ष, भारतीय जनता पक्ष

फोर्स कंपनीच्या प्रस्तावात पीएमपीच्या हिताच्या दृष्टीने सुधारणा झाल्या, तर त्याचा विचार करता येईल. फायद्यातील मार्गांचे खासगीकरण झाल्यास पीएमपीचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तिकिट, जाहिरातींचे उत्पन्न पीएमपीला मिळाले पाहिजे. त्यातून काही रक्कम फोर्स कंपनीला देता येईल; परंतु त्यासाठी कंपनीने सुधारित प्रस्ताव संचालक मंडळाकडे दाखल केला पाहिजे. पीएमपीचे हित डावलून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
- नयना गुंडे, अध्यक्ष, पीएमपी 

असा आहे प्रस्ताव
तीन मार्गांवर २० प्रवासी क्षमतेच्या ३० एसी डिझेल मिनी बस 
७ ते १० मिनिटांच्या अंतराने वाहतूक करतील. 
बसचालक, वाहक, इंधन, देखभाल- दुरुस्तीचा खर्च फोर्स कंपनी करेल.
तिकीट आणि जाहिराती हे फोर्सच्या उत्पन्नाचे साधन असेल.
प्रतिकिलोमीटर पीएमपीला ठराविक रक्कम देण्याची तयारी फोर्सने दर्शविली आहे. 
वेळापत्रक आणि तिकीट दर पीएमपी निश्‍चित करेल.

या प्रस्तावातून निर्माण होणारे प्रश्‍न 
 वर्दळीच्या मार्गावरून मिळणाऱ्या उत्पन्नातून पीएमपी तोट्यातील मार्ग चालविते. जादा उत्पन्नाच्या मार्गांचे खासगीकरण केल्याने नुकसान शक्‍य.
 या तीन मार्गांचे खासगीकरण केले तरी त्यावर पीएमपीला नियमित बस सोडाव्या लागणार, त्यांना प्रवासी मिळणार का? 
 गर्दीच्या वेळेशिवाय अन्य वेळी मिनी बस मार्गावर धावतील का?
 पुरेसे प्रवासी उपलब्ध न झाल्यास फेऱ्या कमी होण्याची शक्‍यता
 कंपनीच्या फायद्याचे गणित न जुळल्यास प्रवासी भाडेवाढ होऊ शकते.

फेबसुकवर आज लाइव्ह चर्चा 
पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासक प्रांजली देशपांडे-आगाशे यांची या विषयावर खुली चर्चा पाहा आज सायंकाळी ७. ३० वाजता ई- सकाळच्या फेसबुक पेजवर 

Web Title: PMP Privatization passenger