पाच मार्गांवर पीएमपीची ‘रातराणी’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील पाच प्रमुख मार्गांवर पीएमपीतर्फे एक जानेवारीपासून नवीन रातराणी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. रात्री बारानंतर दर एक तासाला ही बससेवा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नेहमीच्या तिकिटापेक्षा फक्त पाच रुपये जादा शुल्क असेल, असे प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले. 

स्वारगेट- निगडी (बाजीराव रोड- मुंबई, पुणे रस्त्यामार्गे), पुणे स्टेशन - निगडी (औंध मार्गे), पुणे स्टेशन- एनडीए गेट, स्वारगेट- धायरी, पुणे स्टेशन- वाघोली या मार्गांवर बससेवा सुरू होणार आहे. रात्री बारानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत ही बससेवा उपलब्ध राहणार आहे. सध्या स्वारगेट- हडपसर, पुणे स्टेशन- हडपसर, कात्रज- शिवाजीनगर, कात्रज- पुणे स्टेशन या मार्गांवर रात्र बससेवा सुरू आहे. नव्या आणि जुन्या रात्र बससेवेमधून पीएमपीला दररोज एक लाख रुपयांचे म्हणजे वर्षाला सुमारे चार कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे पीएमपीचे वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

शहरात रात्री, मध्यरात्री बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. हे लक्षात घेऊन पुणे स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट या स्थानकांपासून रातराणीच्या बस प्रवाशांना उपलब्ध होतील. तसेच शहराची उपनगरे आणि मध्यवर्ती भागही त्याला जोडण्यात आले आहेत. या सेवेबाबत प्रवाशांच्या काही सूचना असतील, तर त्या त्यांनी प्रशासनाला लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन वाघमारे यांनी केले आहे. 

Web Title: pmp ratrani on five route