पीएमपी, रिक्षांमुळे रेल्वे स्थानकाबाहेर कोंडी 

प्रशांत घाडगे 
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - पुणे रेल्वे स्थानकाबाहेर पाच ते सहा ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. ससून रुग्णालय ते स्टेशन चौकादरम्यान पोलिसांसमोरच खासगी वाहतूक सुरू असते. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. रेल्वे बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे असतात, त्यातच भर म्हणजे ‘पीएमपी’च्या बस रस्त्यामध्येच थांबतात. त्यामुळे येथे कोंडी होते.  

पुणे - पुणे रेल्वे स्थानकाबाहेर पाच ते सहा ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षा थांबतात. ससून रुग्णालय ते स्टेशन चौकादरम्यान पोलिसांसमोरच खासगी वाहतूक सुरू असते. पोलिस त्यांच्यावर कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. रेल्वे बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे असतात, त्यातच भर म्हणजे ‘पीएमपी’च्या बस रस्त्यामध्येच थांबतात. त्यामुळे येथे कोंडी होते.  

पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ता अरुंद आहे. तसेच रेल्वे स्थानकातील वाहनतळ अपुरे पडत असल्याने अनेक खासगी वाहने प्रवेशद्वारावरच लावली जात असल्याने सकाळी व सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. प्रवाशांना घेण्यासाठी स्थानकाबाहेर अनधिकृत रिक्षा उभ्या असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होतो. यामुळे पोलिसांनी अशा वाहनांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. 

सद्य:स्थिती -
 रेल्वे स्टेशन चौकातील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी असलेल्या वर्तुळाकार सर्कलची दुरवस्था
 स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत खासगी वाहतूक
 स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच लोकांना फसवण्यासाठी सुरू असलेल्या भोंदू खेळांमुळे वाहनांना व पादचाऱ्यांना अडथळा  

उपाययोजना - 
 अनधिकृत खासगी वाहतुकीवर कारवाई करणे गरजेचे 
 सिग्नल सुस्थितीत करणे 
 वाहन पार्किंगची व्यवस्था पुरेशी करणे 
 पदपथावर अतिक्रमण केलेल्या टपऱ्यांवर कारवाई करावी 

मालधक्का चौकातील स्थिती -
वाहनचालक चौकात रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करीत आहेत. झेब्रा क्रॉसिंगचा रंग उडाल्याने, वाहनचालक त्याच्या पुढे जाऊन वाहने उभी करतात. रेल्वे स्थानकातून माल वाहतूक करणारी जड वाहने चौकातून ये-जा करतात. सिग्नलची वेळ जादा असल्याने वाहनचालक तो तोडून ये-जा करतात. परिणामी, वाहतुकीचा वेग मंदावतो. याचा शहराच्या विविध ठिकाणांवरून पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, असे आढळून आले.

सद्य:स्थिती ः
- झेब्रा क्रॉसिंग खराब 
- वाहनांना चौकातून ये-जा करण्यासाठी जागा अपुरी
- वाहने वळताना अडथळा निर्माण होतो
- चौकाच्या कडेला रस्त्यावर वाहने पार्क केलेली असतात
- मालवाहू वाहने चौकात आल्यास वाहतुकीचा वेग मंदावतो
- सकाळी-सायंकाळी वाहतूक कोंडी होते

उपाययोजना -
- चौकात केईएम रुग्णालयाकडील बाजूने बॅरिकेड्‌स उभारावेत 
- मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांना सकाळी आणि सायंकाळी ये-जा करण्यास प्रतिबंध करावा
- वाहने बेकायदेशीरपणे पार्क करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करावी
- वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याकडे डोळेझाक करू नये 

अधिकृत प्रवासी वाहतूकदारांवर कारवाई आणि अवैद्य वाहतूकदारांकडे दुर्लक्ष असे पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ धोरण आहे. वाहतूक सुरळीत करण्याऐवजी इतर गोष्टीत त्यांना रस आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण होतो.
-उत्तम चवरे, मुंबई-पुणे टॅक्‍सीमेन्स असोसिएशन

अवैद्य वाहतूकदारांसोबत ‘अर्थपूर्ण’ संबंध असल्याचा आरोप खोटा आहे. अवैद्य वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर आहे. मात्र, प्रवासी त्यांच्याकडे का जातात, याचा विचार केला पाहिजे. मालधक्का चौकातील झेब्रा क्रॉसिंगबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार झाला आहे. या ठिकाणांची पाहणी करून, आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात येतील.
- चंद्रकांत निंबाळकर, वाहतूक पोलिस निरीक्षक, बंडगार्डन

Web Title: PMP, rickshaws railway station due to congestion