तोट्यातील फेऱ्या पीएमपी करणार बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

पीएमपीकडून शहरातील तोट्यातील मार्ग आणि अनावश्‍यक बस फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत.

पुणे - पीएमपीकडून शहरातील तोट्यातील मार्ग आणि अनावश्‍यक बस फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. पीएमपीच्या मार्गात सुसूत्रीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीमध्ये शहरात गरज नसताना काही मार्ग सुरू आहेत. तसेच, काही मार्गावर गरजेपेक्षा अधिक फेऱ्या सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पीएमपीला तोटा होत असल्याने काही दिवसांत हे तोट्यातील मार्ग आणि फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत. 

पीएमपीच्या सर्व मार्गांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी घेतला होता. त्यानुसार त्यांनी काही मार्ग आणि अनावश्‍यक फेऱ्या बंद केल्या होत्या. पीएमपीचे वेळापत्रक व मार्गांचे निश्‍चितीकरण खूप असल्याने अनेकदा एकाच मार्गावर एकामागे एक बस सोडणे, मोकळ्या गाड्या धावणे, प्रवासी नसतानाही बस सोडणे असे प्रकार घडतात. दरम्यान, मुंढे यांच्या बदलीनंतर मार्ग सुसूत्रीकरणाचे काम रखडले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा या कामाला सुरवात झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: PMP will stop unnecessary bus trips