पुणे : चालत्या बसची स्टेअरिंग हातात आली अन्...

निलेश बोरुडे
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

  • बसीची स्टेरिंग आली हातात
  • चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना

किरकटवाडी (पुणे) : सकाळी पावणे दहाची वेळ. स्वारगेट वरून खानापूर कडे निघालेली बस सिंहगड रोडवरील धायरी फाट्याच्या पुढे लिज्जत पापड कंपनी च्या समोर येते. बसमधून 30 ते 40 प्रवासी प्रवास करत असतात. सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर रहदारी होती. चालक गर्दीतून वाट काढत बस पुढे घेत होता आणि वाहकाचे तिकीट काढण्याचे काम सुरू होते. तेवढ्यात बसमधील सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला; कारण बसचे स्टेरिंग निघून ते थेट बाजूला आले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील सर्व प्रवासी घाबरले. चालकाने मात्र प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केली. बस थांबलेली पाहून बसमधील सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वारगेट -खानापूर पीएमपीएमएल बस क्रमांक १४९६(एम एच १२ इक्यु ३१९८) या बस मध्ये ही घटना घडली. बस चालक ओंकार पवळे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्व प्रवाशांनी कौतुक केले. वाहक राजेंद्र झगडे यांनी बसमधील प्रवाशांना मार्गावरील इतर बसमधून पुढे पाठवले.

फ्लायओव्हरवरून मोटार खाली पडली, एकाचा मृत्यू तर पाच जखमी; व्हिडिओ पाहाच

"जिथे घटना घडली तेथे रस्ता सरळ असल्याने चालकाला बस नियंत्रित करणे शक्‍य झाले. वळणाच्या ठिकाणी किंवा उतारावर असा प्रकार घडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती ‌. पीएमपीएमएल प्रशासनाने तातडीने अशा नादुरुस्त व मोडकळीस आलेल्या बसची दुरुस्ती करावी. सिंहगड रोड वरून धावणाऱ्या अनेक बसची अवस्था अशी केविलवाणी झालेली आहे. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्रशासनाने प्रवाशांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा, अशी प्रतिक्रिया या बसमधून प्रवास करणारे शिक्षक अमोल जानराव यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMPL Bus steering of came in hand in Driver in Pune