पीएमपीएलच्या कामगारांना पहिल्यांदाच मिळणार दिवाळीपूर्वी बोनस!

पीएमपीएलच्या  कामगारांना पहिल्यांदाच मिळणार दिवाळीपूर्वी बोनस!

पुणे : पीएमपीएल कामगारांची यंदाची दिवाळी चांगली जाणार आहे. पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या मध्यस्थीने पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे व कामगार संघटना यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत पीएमपीएलच्या कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचा निर्णय झाला. कामगारांना पहिल्यांदाच दिवाळीपूर्वी बोनस मिळणार असून याचा फायदा तब्बल 9500 कामगारांना होणार आहे. तसेच, बदली रोजंदारी सेवक म्हणून काम करणाऱ्या कामगारांनादेखील येत्या जानेवारीपर्यंत कायम करण्यात येणार असल्याने कामगारांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदमय होणार आहे.  

पीएमपीएल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची लाईफलाईन समजली जाते. परंतु, कायमच या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने ही व्यवस्था सतत समस्यांनी ग्रस्त राहिली. पीएमपीएलच्या कामगारांना आतापर्यंत दिवाळीनंतर बोनस मिळायचा. दिवाळीसारख्या सणाला देखील या कामगारांची परवड होत असे. मात्र, आज राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासोबत पीएमपीएल कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना बरोबर घेत तब्बल दीड तास बैठक घेतली. यामध्ये कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस आश्वासन नयना गुंडे यांनी दिले. तसेच, शहराची ही लाईफलाईन म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पीएमपीएलला सर्वोतोपरी मदत करण्याची भूमिका खासदार संजय काकडे यांनी घेतली आहे.

पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीस भाजपच्या माथाडी कामगार आघाडीचे अध्यक्ष दिनेश धाडवे, तुषार पाटील, पीएमपीएल कामगार संघटनेचे सुनील नलावडे, हरिश ओव्हाळ, कैलास पासलकर, उद्धव भोसले, उल्हास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.  

पीएमपीएलची सेवा सुधारण्यासाठी 3200 बसेसची गरज असल्याची बाब नयना गुंडे यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच, सध्या 1700 बसेस असून त्यातील 1400 बस सुरु आहेत आणि 300 बसेस ब्रेक डाऊन आहेत. तेजेस्विनीच्या 33 बसची नवीन खरेदी होत असून 400 बसेस खरेदीचे टेंडर फायनल झाले असल्याचे व्यवस्थापकीय संचालक गुंडे यांनी सांगितले. एकूण बसेसची संख्या व दोन्ही शहरांतील लोकसंख्या लक्षात घेता नवीन बसेस खरेदी करण्यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावेत. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण निश्चित मदत करू, असे खासदार काकडे यांनी सांगितले.

पीएमपीएलची बस वेळेत यावी व त्याचे वेळापत्रक सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक बस मार्गाचे सर्वेक्षण करून नवीन वेळापत्रक बनवावे. अडीच कोटीचे स्पेअर पार्ट पडून असून काही अधिकाऱ्यांनी त्याची विनाकारण खरेदीदेखील केली आहे. यासंबंधी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्याविषयी अनेकदा तक्रारी येतात. परंतु, त्याची शहानिशा न करताच कारवाई केली जाते. यापुढे असे न करता संबंधीत तक्रारीची सखोल चौकशी करूनच कारवाई करावी. कामगारांना वैद्यकीय रजा मिळाव्यात, कामाचे तास सोईस्कर व कायदेशीर असावेत आणि त्यांना वैद्यकीय सहाय्य योजना लागू करावी. महिला सफाई कर्मचाऱ्यांची कामाची वेळ पहाटे 5 ऐवजी 6 करावी आदी मागण्या खासदार संजय काकडे यांनी यावेळी केल्या. या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ, असे व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com