सार्वजनिक वाहतुकीची ७६ वर्षे

मंगेश कोळपकर 
रविवार, 2 एप्रिल 2017

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांतील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात पीएमपीने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शहरात मेट्रो, बीआरटी, मोनो रेल आदी प्रकल्प येत असताना त्यांना पूरक सेवा म्हणून पीएमपीचे महत्त्व राहणार असून, पुढे ते आणखी वाढणार आहे.

पुण्यातील वाहतुकीची जीवनवाहिनी म्हणजे पीएमपी. या पीएमपीने लाखो पुणेकर प्रवास करतात. ही पीएमपी पुणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. या पीएमपीचा आज (ता. २) ७६ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त घेतलेला आढावा.

२ एप्रिल १९४१ 
स्वारगेट ते शिवाजीनगर यासह चार मार्गांवर सिल्व्हर ज्युबिली या कंपनीच्या बसगाड्या धावू लागल्या आणि पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सेवेची सुरवात झाली. 
 

२ एप्रिल २०१७  
२१०० बस, ११-१२ लाख दररोजचे प्रवासी, दीड कोटी रुपयांचे रोजचे उत्पन्न, १३ आगार, तीन मध्यवर्ती कार्यशाळा आणि दोन महापालिकांसह सुमारे १०१२ चौरस किलोमीटरचे कार्यक्षेत्र. 

सुरवातीला सिल्व्हर ज्युबिली नंतर पीएमटी आणि आता ‘पीएमपीएमएल’ कंपनी असा प्रवास करीत या सार्वजनिक सेवेने ७६ व्या वर्षात आज पदार्पण केले आहे. चार-सहा पेठांचे शहर असताना सुरू झालेली पीएमपी आता पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणापर्यंत पोचली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांतील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात पीएमपीने आजवर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शहरात मेट्रो, बीआरटी, मोनो रेल आदी प्रकल्प येत असताना त्यांना पूरक सेवा म्हणून पीएमपीचे महत्त्व राहणार असून, पुढे ते आणखी वाढणार आहे. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार, दोन्ही महापालिकांच्या प्राधान्यक्रमावर पीएमपी आली आहे. 

पीएमपीचा ताफा 
सध्या सुमारे २१०० बस असून, त्यातील सरासरी १५०० बस रस्त्यावर असतात. एक लाख लोकसंख्येसाठी ५५ बस आवश्‍यक आहेत, असा वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थेचा निष्कर्ष आहे. दोन्ही शहरांतील लोकसंख्या लक्षात घेतली, तर पीएमपीकडे सुमारे तीन हजार बस आवश्‍यक आहेत. मात्र, तुलनेने पीएमपीमध्ये बसगाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांची सातत्याने घटत चाललेली संख्या, त्यातून उत्पन्न कमी, अशा दुष्टचक्रात पीएमपी अडकली आहे. या परिस्थितीत बदल करणे पीएमपीला शक्‍य आहे. बीआरटी मार्गांचे विस्तारीकरण करण्यासाठी दोन्ही महापालिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे एक वर्षांत दोन्ही शहरांत बीआरटीचे आणखी ४५ किलोमीटर मार्ग कार्यान्वित होऊ शकतात; तसेच पीएमपीच्या ताफ्यात १५५० बस समाविष्ट करण्यासाठी दोन्ही महापालिकांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातून प्रवाशांची संख्या निश्‍चितपणे वाढू शकते. 

अशी असेल पीएमपीची पुढील वाटचाल
शहरात तीन वर्षांत मेट्रो प्रकल्पाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार. त्यासाठी पूरक सेवा म्हणून नियोजन करावे लागेल. 
‘एमआय कार्ड’ - पीएमपी, मेट्रो, मोनो रेल, भाडेतत्त्वावरील सायकल आदींच्या वापरासाठी; तसेच एटीएम कार्डच्या धर्तीवर ‘एमआय’ कार्ड वापरण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. दैनंदिन प्रवासासाठीही नागरिक मी कार्ड रिचार्ज करून त्याचा वापर प्रवासासाठी करू शकतील. सध्या पासधारकांना टप्प्याने मी कार्डचे वाटप सुरू असून, आगामी जून महिन्यात दैनंदिन प्रवाशांनाही हे कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
बीआरटीच्या मार्गांचा विस्तार - शहरात कात्रज- स्वारगेट- हडपसर तसेच विश्रांतवाडी, नगर रस्ता येथे बीआरटी आहे. आगामी काळात बीआरटीच्या आणखी तीन मार्गांवर वाहतूक सुरू होणार आहे.  
वाढीव एफएसआयचा वापर - पीएमपीच्या मिळकतींना दीड एफएसआय मंजूर झाला आहे. त्यातील एक एफएसआय पीएमपीसाठी आणि अर्धा एफएसआय व्यावसायिक कारणासाठी पीएमपीला वापरता येणार आहे. त्यातून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोतही निर्माण होईल. 
आगारांचा विस्तार - पीएमपीची गेल्या दोन वर्षांतील आगारांची संख्या १० वरून १३ झाली आहे. आगामी काळात ही संख्या १५-१८ पर्यंत वाढविण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. 
 

पीएमपी लोकप्रिय करणे आणि सुधारण्यासाठी झालेले प्रयोग 
अंध, अपंग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी आदींसाठी ३३ प्रकारच्या सवलतीचे पास
बीआरटी मार्गांचा अवलंब आणि विस्ताराचा आराखडा 
शहरातील प्रमुख मार्गांवर रात्रभर सेवेसाठी ‘रातराणी’
प्रवासी महिलांसाठी विशेष सेवा 
पुणे दर्शनच्या धर्तीवर हेरिटेज, उद्योग, शैक्षणिक आदी विशेष सहलीसाठी सुविधा  
हिंजवडी आणि कोथरूडवरून विमानतळासाठी बस सेवा
क्‍लिनर पदासाठी आयटीआय प्रशिक्षित उमेदवार हवेत  
मोबाईलवर बोलणारे ड्रायव्हर- कंडक्‍टर दाखवा, झेब्रा क्रॉसिंगवर बस उभी केलेली दाखवा आणि १०० रुपये बक्षीस मिळवा 
 

प्रवास पीएमपीचा ...
वर्ष    महत्त्वाच्या घटना
१९४६     सिल्व्हर ज्युबिली मोटर्स कंपनीमार्फत शहरात बससेवेला प्रारंभ
१ मार्च १९४९    नगर परिषदेकडून बससेवेला सुरवात 
१९७०    शहराचे व बसमार्गांचे विस्तारीकरण
१९७७-७८    ना नफा- ना तोटा तत्त्वावर बससेवा
१९७८- ७९    बससेवेला पहिली तूट (१८ लाख ३३ हजार)
२०००    महिलांना पीएमपी सेवेत प्रवेश 
२००३    सहाआसनी रिक्षांना बंदी
२००७    पीएमटी- पीसीएमटीचे एकत्रीकरण, ‘पीएमपीएमएल’ची स्थापना. 
२०१५    शेवटची दरवाढ ( पाचच्या पटीत)

पीएमपीचे कार्यक्षेत्र 
पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे- खडकी- देहूरोड कॅंटोन्मेंट, आळंदी, तळेगाव दाभाडे नगरपालिका क्षेत्र, जिल्हा परिसरातील १२४ गावे : एकूण क्षेत्र चौरस किलोमीटर १०१२
 प्रमुख मार्ग - हडपसर, उरळी कांचन, खेड शिवापूर, कोंढणपूर, सासवड, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, वाघोली, केसनंद फाटा, बहुळ, राजगुरुनगर, वडगाव मावळ, नसरापूर, किवळे, घोटावडे, पौड, पिरंगुट, शिवणे, एनडीए आदी.    
 

पीएमपीमुळे विकास  
सर्वाधिक वेगाने विकसित झालेले उपनगर, असा कोथरूडचा उल्लेख आहे. कारण त्याला कारणीभूत आहे पीएमपीची सेवा. केवळ कोथरूडच नव्हे, तर हडपसर, कात्रज, वाघोली- खराडी, बिबवेवाडी, धनकवडी आदी भागांचा विकास वेगाने होण्यासही पीएमपी कारणीभूत ठरली आहे. याबाबत पीएमपीमधील विधी अधिकारी त्र्यंबक धारूरकर म्हणाले, ‘‘पीएमटीच्या विस्तारीकरणाला सुरवात झाल्यानंतर मनपा ते कोथरूड गावठाण मार्ग सुरू झाला. दरम्यान पेठांमधले बरेचसे नागरिक उपनगरांकडे वळू लागले होते. त्यामुळे पीएमटी प्रशासनाने कोथरूडमध्ये डेपो उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९८८ मध्ये जागा ताब्यात घेण्यात आली. या ठिकाणी डेपो बांधल्यानंतर दुसऱ्याच दिवशी येथील जागांच्या किमतीत तब्बल ६०० रुपये चौरस फुटांनी वाढ झाली आणि पाहता पाहता या भागाचा कायापालट झाला.’’

कोथरूड डेपोचे पहिले व्यवस्थापक सूर्यकांत मते म्हणाले,‘‘कोथरूड डेपोमध्ये काम करताना सुरवातीला अनंत अडचणींचा सामोरे जावे लागले. डेपो नव्याने सुरू झाल्यानंतरही तेथे पुरेशा बसेस नव्हत्या. शेतीच्या जागी उभारण्यात आलेल्या डेपोमुळे पावसाळ्यात नादुरुस्त झालेली बस चिखलातून गॅरेजपर्यंत न्यावी लागत असे. यासाठी कामगारांना मोठी कसरत करावी लागत. डेपो शहरापासून दूर असल्यामुळे कामगार त्या ठिकाणी काम करायला येत नव्हते. डेपोमध्ये बदली म्हणजे एकप्रकारची शिक्षाच वाटत. आता मात्र तेथे महापालिकेच्या माध्यमातून बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डेपोमुळे कोथरूड भागाचाही कमी वेळेत अतिशय चांगला विकास झाला.’’ 

विभाजनचा घाट आणि वाद 
दोन्ही महापालिकांतील परिवहन समित्यांचे अस्तित्व संपवून पीएमपी कंपनीची स्थापना झाल्यामुळे बस, सुटे भाग खरेदी, नोकर भरती आदींचे निर्णय कंपनीला मिळाले; तसेच दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पीएमपीच्या अध्यक्षांना मिळाले. पीएमपीच्या दैनंदिन संचालनातील तूट भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांनी निधी देणे कायद्याने आता बंधनकारक झाले आहे; परंतु त्याबाबत दोन्ही महापालिकांकडून वेळोवेळी खळखळ केली जाते. ‘आम्ही फक्त तोटा भरून द्यायचा का,’ असा प्रश्‍न महापालिकांकडून विचारला जातो; परंतु प्रवाशांसाठी तोटा भरून काढणे, ही महापालिकांची जबाबदारी आहे, याचा विसर दोन्ही महापालिकांना पडतो. त्यामुळे विभाजन करा, असा सूर अधूनमधून उमटतो; परंतु विभाजन झाल्यास एकाच मार्गांवर दोन्ही महापालिकांच्या बस धावतील, स्वतंत्र बस थांबे होतील, कर्मचाऱ्यांवरील खर्चात वाढ होईल, या मूलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे सखोल अभ्यासाअंती झालेल्या एकत्रिकरणाच्या उद्देशाला खीळ बसून परिस्थिती आणखी खालावेल, याचे भान राखले जात नाही.  
 

बस डे...

पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे तो बससेवेचा. पुण्यात पुरेशी वाहतूक यंत्रणा आली, तर नेमका बदल काय होईल, या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी किमान एक दिवस तसा प्रयोग करून बघण्याची योजना आखण्यात आली. ही योजना म्हणजेच बहुचर्चित बस डे!
बस डे योजना ‘सकाळ’ने मांडली असली आणि त्यासाठी भरपूर प्रयत्न केले असले, तरी ती होती सर्व पुणेकरांची योजना. ‘सकाळ’ने या योजनेची संकल्पना मांडली, पीएमपी प्रशासनाला मदतीचा हात देऊ केला असला, तरी ‘सकाळ’च्या हाकेला पुणेकरांनी भरभक्कम प्रतिसाद दिल्याने योजनेचे श्रेय सगळ्याच पुणेकरांना जाते. 

पुण्यात पीएमपीच्या किती बस हव्यात? सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे रस्त्यावरील बसगाड्यांची संख्या ५५ असण्याची गरज पुण्याला आहे. म्हणजेच किमान तीन हजार बसगाड्यांची आवश्‍यकता आहे. मात्र पुण्यात दोन हजार बसगाड्या असून, रस्त्यावरील बसगाड्यांची संख्या केवळ चौदाशे आहे. त्यामुळे किमान दीड हजार आणखी बसगाड्यांची गरज भासते. म्हणूनच एक दिवस पुरेशा बसगाड्यांचा म्हणजेच बस डे ची घोषणा ‘सकाळ’ने केली. पीएमपी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आणि सर्वसामान्य पुणेकरांनी त्याला मनापासून प्रतिसाद दिला. सगळे पुणे २ नोव्हेंबर २०१२ या दिवशी रस्त्यावर आले आणि त्यांनी बसने प्रवास केला. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली, एकही अपघात त्या दिवशी पुण्यात झाला नाही. 

महिलांचा प्रवेश 
पीएमपीमध्ये भरतीसाठी नेहमी जाहिरात काढण्यात येते. पूर्वी त्यामध्ये ‘फक्त पुरुषांनीच अर्ज करावा, महिलांनी अर्ज करू नये,’ असे लिहिले जाई. अशीच जाहिरात १९९१ मध्ये छापण्यात आली. त्या वेळी एका महिलेने भरतीसाठी अर्ज केला; तसेच अर्ज ग्राह्य न धरल्यास कोर्टात जाण्याचेही सांगितले. प्रशासनाने या अर्जावर विचार करून त्या महिलेस परीक्षेस बसण्यास परवानगी दिली. त्या वर्षीपासूनच महिलांना पीएमपीमध्ये प्रवेश मिळू लागला. मात्र महिलांना वाहक म्हणून प्रत्यक्ष कामात रुजू होण्यासाठी सन २००० पर्यंत वाट पाहावी लागली. याउलट पिंपरी-चिंचवड परिवहन सेवेत त्यांना १९९४ पासून वाहक म्हणून काम दिले जात. सुरवातीला केवळ ‘स्वीपर’ या पदावर काम करणाऱ्या महिला आता स्वीपर, क्‍लार्क, कंडक्‍टर या पदांवर काम करत आहेत. 

सक्षम अधिकाऱ्यांची वानवा 
पीएमपीची कंपनी २००७ मध्ये स्थापन झाली. तेव्हापासून पीएमपीत सुबराव पाटील आणि आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता कोणताही अधिकारी आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे दहा वर्षांत ११ अधिकाऱ्यांची पीएमपीमध्ये नियुक्ती झाली. त्यामुळे पीएमपी प्रशासन कायमच पूर्णवेळ आणि कालावधी पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: PMPML : 76 years of Public transportation