महिलांसाठी आज 'तेजस्विनी बस' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

शहरांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या वतीने 'तेजस्विनी बस' ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता स्वतंत्र बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.

पुणे : महिलांच्या सुरक्षिततेसाठी आखलेल्या 'तेजस्विनी बस' योजनेचा भाग म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी (ता. 8) खास महिलांकरिता विविध मार्गांवर स्वतंत्र बससेवा पुरविण्यात येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत सकाळी आणि सायंकाळी 12 बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

यासाठी महिलांची वर्दळ असलेल्या सहा मार्गांची निवड करण्यात आली असून, त्यावर सकाळी सव्वानऊ ते पावणेदहा आणि सायंकाळी पाच वाजून 55 मिनिट ते सहा वाजून दहा मिनिटे या वेळेत या बसगाड्या धावतील, असे पीएमपी व्यवस्थापनाने कळविले आहे. 

राज्याच्या विविध शहरांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारच्या वतीने 'तेजस्विनी बस' ही योजना राबविण्यात येणार आहे. त्याकरिता स्वतंत्र बसगाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत या बसगाड्या उपलब्ध होतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, महिला दिनाचे औचित्य साधून या योजनेचा भाग म्हणून बुधवारी महिलांकरिता स्वतंत्र बससेवा पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता 'पीएमपी'च्या ताफ्यातील बसगाड्या वापरण्यात येतील. 

दरम्यान, या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 50 बसगाड्या देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, शहरातील महिला प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही संख्या फारच तोकडी असल्याचे पीएमपी व्यवस्थापनाने राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार पुण्यासाठी 70 बस निश्‍चित करून त्याला मंजुरी दिल्याचे पीएमपीचे वाहतूक महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 
 

Web Title: pmpml schedules tejaswini special buses for women