पीएमपीच्या ताफ्यात दीड हजार बस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस उपलब्ध करण्याचा निर्णय अखेर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी घेतला. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. त्यामुळे 2009 पासून रखडलेल्या बस खरेदीला आता मुहूर्त मिळाला असून, येत्या तीन-चार महिन्यांत त्या टप्प्याटप्प्याने दाखल होतील. 

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस उपलब्ध करण्याचा निर्णय अखेर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी घेतला. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. त्यामुळे 2009 पासून रखडलेल्या बस खरेदीला आता मुहूर्त मिळाला असून, येत्या तीन-चार महिन्यांत त्या टप्प्याटप्प्याने दाखल होतील. 

बस खरेदीचा विषय सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मांडला होता. त्याला कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) साथ देत ठराव मंजूर केला. बस खरेदीचे अधिकार आयुक्तांना देण्याऐवजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला देण्याची उपसूचना या वेळी मंजूर झाली. 

याबाबत महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ""बस खरेदीचा निर्णय शहरासाठी ऐतिहासिक असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. महापौरपदाची सूत्रे स्वीकारताना शहरात 1550 बस खरेदी करण्याची घोषणा केली होती. तसेच राष्ट्रवादीने पुणेकरांना याबद्दल दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करताना आनंद होत आहे.‘‘ महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीही बस खरेदीसाठी आग्रही भूमिका घेतली होती.

अशा उपलब्ध होणार बस
अल्प व्याजदराने उपलब्ध होणाऱ्या वित्तपुरवठ्यातून 900 बस पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने पीएमपीमार्फत खरेदी करणार आहे. केंद्र सरकारच्या अंगीकृत "एसएसआरटीयू‘ या संस्थेकडून 550 बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. 100 बस पुणे महापालिका अर्थसंकल्पातील तरतुदीतून खरेदी करणार आहे. वित्तपुरवठ्याद्वारे बस खरेदीसाठी आणि संचालनातील तुटीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका सहकार्य करतील, असेही बस खरेदीच्या ठरावात म्हटले आहे.
 

बस येण्यास दीड महिन्यात प्रारंभ
1550 पैकी भाडेतत्त्वावरील बस दीड महिन्यात टप्प्याटप्याने येण्यास प्रारंभ होऊ शकतो. दरम्यानच्या काळात बस खरेदीसाठी जागतिक निविदा मागविल्या जातील. अल्प व्याजदराच्या वित्तपुरवठ्यातून त्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. या प्रक्रियेला तीन-चार महिने लागतील. त्यानंतर कार्यादेश दिल्यावर ऑक्‍टोबरपासून बस येण्यास प्रारंभ होईल. मात्र, मंजुरीचे सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे आता प्रशासकीय प्रक्रिया किती वेगाने गतिमान होईल, यावर बस उपलब्ध होण्याचे वेळापत्रक अवलंबून असेल.

Web Title: PMP's bus fleet and a half thousand