पीएमपीच्या नव्या बस वैविध्यपूर्ण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या बसगाड्यांचा रंग आणि रचना आकर्षक असून, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांतील बसगाड्या असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली. 

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या नव्या बसगाड्यांचा रंग आणि रचना आकर्षक असून, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांतील बसगाड्या असतील, अशी माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरुवारी दिली. 

बसगाड्यांचा रंग आणि रचनेसंदर्भात 5 ते 12 ऑक्‍टोबर या कालावधीत नागरिकांचा कौल जाणून घेतला जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांच्या सूचनांनुसार बसगाड्यांचे रूप ठरविण्यात येणार आहे. पीएमपीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून नव्याने खरेदी करण्यात येणाऱ्या सुमारे दीड हजार बसगाड्या आकर्षक करण्याचा प्रयत्न आहे. "बीआरटी‘ सेवेतील बसगाड्यांची रचना स्वतंत्र असून, या गाड्यांसाठी वेगळा रंग राहणार आहे. अन्य मार्गांवरील बसगाड्यांसाठी रंगसंगती आणि रचना (डिझाईन) तयार केली आहे. त्यात प्रामुख्याने पर्यावरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मांडणी केलेली असेल. पक्ष्यांची चित्रेही रेखाटली जातील. विद्यार्थ्यांच्या सेवेत असलेल्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र रचना तयार करून घेतली जाणार आहे. त्याची छायाचित्रे प्रसिद्ध करून नागरिकांकडून कौल घेतला जाणार आहे. त्यासाठी 7887810000/1/2/3 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

कुमार म्हणाले, ‘बसगाड्या आकर्षक करत असताना त्यावर जाहिराती केल्या जाणार नाहीत. त्याऐवजी बसच्या आतील बाजूला डिजिटल बोर्ड लावून जाहिरातींची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या त्या मार्गावरील बसउत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे. पीएमपी ताफ्यातील जुन्या बसगाड्यांचा रंग बदलण्याबाबत विचार सुरू असून, त्याचा निर्णय होईल.‘‘ 

तळेगावचा प्रकल्प पिंपरीत आणणार 
ओल्या कचऱ्यापासून "बायो सीएनजी‘ तयार करण्याचा प्रकल्प "बीओटी‘ तत्त्वावर तळेगाव येथे उभारला आहे. या प्रकल्पातील बायो सीएनजीचा बसगाड्यांसाठी वापर होऊ शकतो. या प्रकल्पाला "एआरएआय‘ आणि "डीआरडीई‘ची मंजुरी मिळाली आहे. तळेगाव येथून "सीएनजी‘ पिंपरीतील "पीएमपी‘ डेपोत आणण्याचे नियोजन आहे. या डेपोतून बाहेर पडणाऱ्या बसगाड्या "बायो सीएनजी‘वर धावू शकतील. कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या "सीएनजी‘वर सार्वजनिक वाहतूक सेवेतील बसगाड्या चालविण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरेल, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.

Web Title: PMP's diverse new bus