पीएमपीचे उत्पन्न पुन्हा वाढू लागले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर पीएमपीचे दैनंदिन निव्वळ तिकीट विक्रीतून घटलेले उत्पन्न आता वाढू लागले आहे. येत्या दोन-चार दिवसांत पीएमपीचे उत्पन्न नेहमीची सरासरी गाठेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

पुणे - केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यावर पीएमपीचे दैनंदिन निव्वळ तिकीट विक्रीतून घटलेले उत्पन्न आता वाढू लागले आहे. येत्या दोन-चार दिवसांत पीएमपीचे उत्पन्न नेहमीची सरासरी गाठेल, असा विश्‍वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दैनंदिन तिकीट विक्रीतून पीएमपीला दररोज 1 कोटी 20 ते 30 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने आठ नोव्हेंबर रोजी घेतला. त्यानंतर लगेचच पुढील चार-पाच दिवसांत या उत्पन्नात सुमारे 20 लाखांची घट होऊन ते एक कोटी पाच लाख रुपयांवर आले होते. त्यातच दीपावलीच्या सुटीनंतर अनेक चालक-वाहक रजेवर गेल्यामुळे 1500 ऐवजी सुमारे 1100 मार्गावर होत्या. मात्र, आता सुट्या संपवून ते पुन्हा कामावर रुजू होऊ लागले आहेत. परिणामी सध्या 1450 बस मार्गावर आहेत. तसेच नव्या नोटांचा चलन पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत होऊ लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून पीएमपीचे उत्पन्न वाढले आहे. सध्या सुमारे एक कोटी 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक विभागाचे प्रमुख व मुख्य व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. 

100, 50 आणि 20 रुपयांच्या नोटा बाजारपेठेत उपलब्ध होऊ लागल्याचे गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे पीएमपीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न पुन्हा जमा होऊ लागले आहे. चलन पुरवठा सुरळीत झाला, तर येत्या दोन-चार दिवसांत पीएमपीचे दैनंदिन उत्पन्न पूर्ववत होऊ शकते, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सुटे पैसे घेऊनच प्रवास करावा, या प्रशासनाच्या आवाहनाला प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 

Web Title: PMP's revenue began to grow again