‘पीएमआरडीए’कडून बांधकामांना दिलासा

PMRDA
PMRDA

पुणे - राज्य सरकारने मान्य केलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बांधकाम नियमावलीमुळे छोट्या प्लॉटधारकांना दिलासा मिळाला आहे. वीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना १५ टक्के सुविधा क्षेत्र (ॲमेनिटी स्पेस) आणि १० टक्के मोकळी जागा (ओपन स्पेस) ठेवण्याचे बंधन नियमावलीतून वगळण्यात आले आहे. 

पीएमआरडीएच्या बांधकाम नियमावलीस राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. या नियमावलीत छोट्या प्लॉटधारकांसाठी अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. यापूर्वी केवळ महापालिकेच्या हद्दीत या सवलती होत्या; परंतु आता प्राधिकरणाच्या हद्दीतही या सवलती लागू झाल्या आहेत. यापूर्वी जमीन विकसित करण्यासाठी घेतल्यानंतर त्यावर नियमानुसार १५ टक्के ॲमेनिटी स्पेस आणि १० टक्के ओपन स्पेस ठेवण्याचे बंधन होते.

त्यामुळे वीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना बांधकाम करणे अवघड होत होते. त्यामुळे ॲमेनिटी स्पेस आणि ओपन स्पेसमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी होत होती. ती अखेर मान्य झाली; तसेच या नियमावलीत वीस गुंठ्यांच्या आत क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटधारकांना टीडीआरदेखील लागू करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी नऊ मीटर रुंदीच्या रस्त्याचे बंधन ठेवले आहे. वीस गुंठ्यांच्या वर आणि चाळीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना दहा टक्के ओपन स्पेसचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे, तर ॲमेनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन काढून टाकताना या प्लॉटधारकांना ०.७५ टक्के एफएसआय वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

अशी आहे नियमावली
    वीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना ॲमेनिटी व ओपन स्पेस ठेवण्याच्या बंधनातून वगळले. 
     प्लॉटची गुंठेवारी नसेल तर ०.७५ टक्केच एफएसआय  
     गुंठेवारी झाली असेल तर १.१० एफएसआय  
     गुंठेवारी अथवा गुंठेवारी न झालेल्या; परंतु नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्याचा टीडीआर 
     फक्त निवासी झोनमधील जागांसाठी सवलत 

छोट्या प्लॉटधारकांसाठी ओपन स्पेस आणि ॲमेनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन वगळण्यात आले आहे; परंतु ही सवलत फक्त निवासी विभागातील जागांसाठी आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना फारसा आळा बसेल असे नाही.
- सुधीर कुलकर्णी, नागरी हक्क समिती

माझी पिरंगुट येथे चार गुंठे जागा आहे. पीएमआरडीएने नियमावलीत सवलत दिल्यामुळे ती विकसित करणे सोपे जाणार आहे. यापूर्वी सवलत नसल्यामुळे ती विकसित करताना अडचणी येत होत्या.
- जगदीश सपार, पिरंगुटचे रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com