'पीएमआरडीए'चा रिंगरोड इकॉनॉमिक कॉरिडॉर - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड हा "इकॉनॉमिक कॉरिडॉर' म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेती, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला तो चालना देणारा ठरेल,'' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली.

पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड हा "इकॉनॉमिक कॉरिडॉर' म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेती, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला तो चालना देणारा ठरेल,'' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज "पीएमआरडीए'ची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, 'हा रस्ता 128 किलोमीटर लांबीचा असून पुणे व पिंपरी- चिंचवड शहराला वळसा घालणारा आहे. "पीएमआरडीए'ने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या रस्त्याचे नियोजन केले असून, देशातील सर्वोत्तम बाह्यवळण रस्ता म्हणून तो ओळखला जाणार आहे. हा मार्ग तयार करत असताना सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे.''

बैठकीत माहिती देताना "पीएमआरडीए'चे आयुक्त महेश झगडे म्हणाले, 'हा बाह्यवळण रस्ता आठ पदरी आणि 110 मीटर रुंदीचा असणार आहे. हा मार्ग संपूर्णतः सिग्नलमुक्त असणार आहे. रस्त्याच्या निर्मितीप्रसंगी व्यावसायिक दृष्टिकोनही समोर ठेवला जाणार आहे, त्यामुळे रोजगार निर्मितीतही वाढ होणार आहे. रस्त्यासाठी जमीन संपादनासाठी नियमाद्वारे मार्ग काढण्याचे काम सुरू आहे.''

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, 'पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्राच्याही एरिअल सर्व्हेसाठी तीच एजन्सी नेमता येईल का ते पाहावे. बाह्यवळण मार्ग करताना जोडरस्तेही घेण्याची तरतूद करावी. बाह्यवळण मार्गावर दर 15 किलोमीटर अंतरावर विश्रांतिगृह, रुग्णालयांची तरतूद व्हावी. पूर्वी दाखवण्यात आलेल्या बाह्यवळण मार्गात आता काही ठिकाणी "एमआयडीसी', तसेच काही ठिकाणी अतिक्रमण झालेआहे. "एमआयडीसी' वगळता इतर अतिक्रमणे काढण्याबाबत योग्य तो मार्ग अवलंबण्यात यावा.''

असा असेल 'इकॉनॉमिक कॉरिडॉर'
- 128 किलोमीटर लांबीचा रस्ता
- पुणे व पिंपरी- चिंचवडला वळसा घालणार
- बाह्यवळण रस्ता आठ पदरी, 110 मीटर रुंदीचा
- संपूर्ण मार्ग सिग्नलमुक्त

Web Title: pmrda ringroad economic coridor