‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ‘टीडीआर’ देण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

भूसंपादनासाठी ‘टीडीआर’
रिंगरोड, मेट्रो, हायपरलूप यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प ‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. हे भूसंपादन आता ‘टीडीआर’च्या माध्यमातून करणे शक्‍य होणार आहे.

टीडीआर म्हणजे काय? 
हस्तांतरणीय विकास हक्क : आरक्षणाच्या जागेच्या मोबदल्यात मिळणारा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय). हद्दीत कुठेही वापरता येतो.

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यास सुरवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर प्रथमच ‘टीडीआर’ वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा आणि ॲमेनिटी स्पेसच्या जागांसाठीच ‘टीडीआर’ देण्यात येत आहे. विकास आराखडा तयार झाल्यानंतर सर्व प्रकाराच्या आरक्षणांसाठी तो दिला जाईल. 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर सुनियंत्रित विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून तीन वर्षांपूर्वी ‘पीएमआरडीए’ची स्थापना करण्यात आली. गेल्या वर्षी ११ डिसेंबरला ‘पीएमआरडीए’च्या हद्दीसाठी राज्य सरकारकडून बांधकाम नियमावली मंजूर करण्यात आली. या नियमावलीत ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत आरक्षित जागा ताब्यात घेण्यासाठी ‘टीडीआर’ची तरतूद करण्यात आली. हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचेही काम ‘पीएमआरडीए’कडून अंतिम टप्प्यात आले आहे.

बांधकाम नियमावलीस चार महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून मान्यता मिळाली. त्या नियमावलीत ‘टीडीआर’ची तरतूद आहे. त्यानुसार ‘टीडीआर’ देण्यास सुरवात झाली असून, अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.
- गणेश चिल्लाळ, सहायक नगररचनाकार, पीएमआरडीए

Web Title: PMRDA TDR Municipal