Pune Rains : सुटीवर जाण्याआधीच काळाचा घाला

PMT driver Vijay Navaghane died rainstorm in Pune special Story
PMT driver Vijay Navaghane died rainstorm in Pune special Story

स्वारगेट : विजय नवघणे यांना राजकारणाची अत्यंत आवड होती. प्रत्येक निवडणुकीत त्यासाठी ते रजाही काढत असत. सध्या विधानसभा निवडणुकीत रंग भरू लागला असून, त्यासाठी ते लवकरच रजेवरही जाणार होते. आपल्या आवडत्या पक्षाचा प्रचार ते हिरीरीने करणार होते. त्यासाठी त्यांनी नियोजनही केले होते. मात्र, नियतीला ते मंजूर नसावे. कामातून सुटी घेण्याआधीच काळाने त्यांच्यावर अमानुष घाला घातला.

मन सुन्न करणारी ही घटना विजय नवघणे (वय- 55) यांच्याबाबत बुधवारी घडली. टिळक रस्त्यावर पीएमपीच्या सर्व्हिस व्हॅनवर पिंपळाचे झाड कोसळून त्यात ते जखमी झाले. मात्र, वेळीच मदत न मिळाल्याने दोन तास तडफडून त्यांचा मृत्यू झाला. धनकवडीतील श्रीनगर भागात नवघणे यांच्या निवासस्थानी आज शोकाकूल वातावरण होते. कुटुंबीय व नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे ह्दय पिळवाटून टाकत होता. नवघणे यांना वेळीच मदत न मिळाल्याने त्यांच्या मित्रमंडळींमध्ये मात्र संताप व्यक्त होत होता. सगळ्यांच्या मदतीला धावणाऱ्या बंडूला, मात्र कोणीही मदत केली नाही, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली. याला जबाबदार कोण? असाही प्रश्‍न ते विचारत होते. नवघणे यांच्यावर दुपारी बाराच्या सुमारास धनकवडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

नवघणे हे मूळचे खरमरे (ता. हवेली) येथील आहेत. त्यांचे वडील धनकवडी भागातील श्रीनगर येथे आपल्या व्यावसायिक कामासाठी स्थायिक झाले. त्यांच्यामागे पत्नी पूजा, मुलगा तुषार व मुलगी आरती दळवी असा परिवार आहे. मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तर मुलीचे लग्न झाले आहे. विजय यांना बंडू या टोपण नावाने ओळखले जायचे. सतत हसतमुख व दुसऱ्यांना मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे या भागात सर्वांना ते परिचित होते. पीएमटीमध्ये त्यांची 25 वर्षे सेवा झाली होती. त्याचबरोबर ते सामाजिक कामातही ते अग्रेसर होते. छत्रपती शिवाजी गणेश मंडळाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.

संकटकाळात वाऱ्यावर सोडले
विजय आनंदी व दिलखुलास माणूस होता. कामातही कायम तत्पर असायचा. काल टिळक रस्त्यावर बस बंद पडली आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार ते तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले पण मुसळधार पाऊस सुरू झाला म्हणून त्यांनी गाडी बाजूला लावली. त्याचवेळी पिंपळाचे झाड बसवर कोसळले. त्यांचे दोन सहकारी पाठीमागील दरवाजाने बाहेर पडले. नवघणे यांनी पुढील दरवाज्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने मध्येच ते अडकले. दोन तास त्यांची मृत्यूशी झुंज चालू होती. पण त्यांना वेळेवर मदत मिळाली नाही. विजयला वेळेवर मदत मिळाली असती, तर तो गेला नसता. आम्हाला राबवून घेऊन, संकटाच्या वेळी वाऱ्यावर सोडायचे, हे चुकीचं आहे, अशी खंत त्यांचे सहकारी बाळासाहेब निंबाळकर यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com