फौजदारच पोलिसांच्या ताब्यातून पसार

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करणारा फौजदार संतोष लोंढे हा पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. दौंड शहरातील रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस ठाण्यातून तो पसार झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांच्या विलंबाने फिर्याद देण्यात आली आहे.

दौंड (पुणे) : दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करणारा फौजदार संतोष लोंढे हा पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. दौंड शहरातील रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस ठाण्यातून तो पसार झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांच्या विलंबाने फिर्याद देण्यात आली आहे.

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार राकेश फाळके यांनी मंगळवारी या बाबत माहिती दिली. रेल्वे प्रवासात एका रेल्वे तिकीट परीक्षक यांना मारहाण केल्याप्रकरणी इंद्रजित महादेव यादव (रा. बालाजीनगर, लिंगाळी, दौंड) याच्याविरुद्ध दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यात 13 ऑगस्ट रोजी दौंड लोहमार्ग न्यायालयात रेल्वे सुरक्षा दलाचे फौजदार संतोष श्रीरंग लोंढे (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी इंद्रजित यादव याच्याऐवजी एक बनावट तरुण आरोपी म्हणून न्यायालयासमोर हजर केला. न्यायाधीश जी. एस. वर्पे यांना शंका आल्याने त्यांनी आरोपीचे ओळखपत्र सादर करण्यास सांगितले असता तो करू न शकल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.

दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी लोहमार्ग न्यायालयाने रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक राठोड यांना फौजदार श्रीरंग लोंढे यास ताब्यात घेऊन दौंड पोलिसांसमोर हजर करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर संतोष लोंढे यास 16 ऑगस्ट रोजी सोलापूर येथे ताब्यात घेण्यात आले. पोलिस बंदोबस्तात 17 ऑगस्ट रोजी त्यास दौंड रेल्वे सुरक्षा दल पोलिस ठाण्यात आणले असता मध्यरात्री पावणेतीन वाजता संतोष लोंढे हा लघुशंकेसाठी जायचे कारण सांगत पसार झाला. या बाबत सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल विकास गौरकतर यांनी मंगळवारी (ता. 20) दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

यापूर्वीच केले आहे निलंबित
लोहमार्ग न्यायालयाचे सहायक अधीक्षक यांनी 17 ऑगस्ट रोजी दौंड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष लोंढे, इंद्रजित यादव व बनावट आरोपी म्हणून उभा करण्यात आलेला अज्ञात इसम यांच्याविरुद्ध न्यायालयाची फसवणूक करणे, बनावट आरोपी हजर करणे आणि शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. रेल्वे सुरक्षा दलाने दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक बी. बी. सिरपोर व फौजदार संतोष श्रीरंग लोंढे यांना निलंबित केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Absconding