esakal | जेसीबीच्या साहय्याने उरुळी कांचन येथील थ्रिस्टार मटका अड्डा जमिनदोस्त
sakal

बोलून बातमी शोधा

जेसीबीच्या साहय्याने उरुळी कांचन येथील थ्रिस्टार मटका अड्डा जमिनदोस्त

पोलिसांच्याकडून जेसीबीच्या साहय्याने उरुळी कांचन येथील थ्रिस्टार मटका अड्डा जमिनदोस्त.

जेसीबीच्या साहय्याने उरुळी कांचन येथील थ्रिस्टार मटका अड्डा जमिनदोस्त

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : प्रशस्त पार्किंग, आराम करण्यासाठी मऊमऊ सोफा, येणाऱ्या जाणाऱ्यांना गरम होऊ नये यासाठी नामांकित कंपण्यांचे कुलर, ठिकठिकाणी सिसिटीव्ह कॅमेरे. पिण्यासाठी ब्रॅन्डेड कंपण्याचे बिसलरी पाणी... हे वर्णन एखाद्या थ्रिस्टार हॉटेल अथवा रिसॉर्टचे नाही तर... हे वर्णन आहे पोलिसांनी जेसीबीच्या साहय्याने जमिनदोस्त केलेल्या उरुळी कांचन येथील थ्रिस्टार मटका अड्ड्याचे.. 

वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सपना झाली साखर कारखान्यात कामगार कल्याण अधिकारी

हडपसर-सासवड मार्गावरील दिवेघाटातील एका बड्या हॉटेलमध्ये चार दिवसांपुर्वी झालेल्या जुगार अड्ड्यावरील मोठ्या कारवाईची चर्चा चालू असतानाच, जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी (ता. ७) रात्री बारामती शहरातील पाचहून अधिक ऑनलाईन जुगारावर कारवाई करुन, एकच खळबळ उडवून दिली होती. वरील कारवाईचा धुरळा खाली बसण्यापुर्वी डॉ. देशमुख यांच्या विशेष पथकाने उरुळी कांचन येथील थ्रिस्टार मटका अड्ड्यावर छापा टाकून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांच्या बरोबरच, पोलिसांनाही मापात राहण्याचा इशारा दिल्याचे दिसून येत आहे.

पेपर देता आला नाही? टेन्शन घेऊ नका; पुणे विद्यापीठ घेणार 'स्पेशल परीक्षा'!

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रेल्वेखालील दत्तवाडी जवळ विकी कांचन याने मागील काही दिवसांपासून एका भल्या मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका व जुगाराचा अड्डा सुरु केल्याची गोपनीय माहिती पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लोणी काळभोरचे प्रभारी अधिकारी, पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. देशमुख यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एस. के. रानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांनी गुरुवारी (ता. ८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विकी कांचन याच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. 

पोलिसाची वाहने येत असल्याचे लक्षात आल्याने, शेडमधील चार ते पाच जण पळून गेले, पण पोलिसही पत्र्याच्या शेड सभोतालचे व शेडमधील नियोजन पाहून चक्रावून गेले. मटका खेळण्यासाठी येणाऱ्यासाठी प्रशस्त पार्किंग, आराम करण्यासाठी मऊमऊ सोफा, येणाऱ्या जाणाऱ्यांना गरम होऊ नये यासाठी नामांकित कंपण्यांचे कुलर, पिण्यासाठी ब्रॅन्डेड कंपण्याचे बिसलरी पाणी अशा थ्रिस्टार हॉटेल सारख्या सुविधा करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करुन, मटक्याचे अकरा हजार रुपयांचे साहित्य जप्त केले व त्यानंतर जेसीबीच्या साहय्याने शेडसह, वॉटर कुलर, सोफे, टेबलसह सर्व प्रकारचे साहित्य जमिनदोस्त करुन टाकले. या प्रकरणी विकी कांचन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, विकी कांचन फरार झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बोलणे कमी, कारवाई जादा....
डॉ. अभिनव देशमुख यांनी पोलिस अधिक्षक म्हणुन रुजू झाल्यापासून, जिल्ह्यातील प्रमुख पोलिस ठाण्यावर लक्ष केंद्रित करुन अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरु केला आहे. कोल्हापुर जिल्ह्याचे अधिक्षक असताना, देशमुख यांनी अशाच पध्दतीने अवैध धंद्यावर कारवाई करुन, अवैध धंदेवाल्याचे कंबरडे मोडले होते. विशेष बाब म्हणजे कोल्हापुर जिल्हात अवैध धंद्यावरील कारवाई नंतर, अवैध धंदे पाठीशी घालणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही देशमुख यांनी कारवाईचा बडगा उगारलेला होता. दरम्यान मागील आठ दिवसांच्या काळात सासवड, बारामती, शिरुर, भिगवनसह अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाळू, मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे. विशेष बाब म्हणजे कारवाई करतांना, स्थानिक पोलिसांना अंधारात ठेऊन कारवाई करण्यावर डॉ. देशमुख यांनी भर दिला आहे.