पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका

पुण्यात पोलिसांकडून कारवाईचा धडाका

पुणे -  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पुणे पोलिसांनी शहरातील किरकोळ ते सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक  कारवाई करण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये दरोडा, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए), बेकायदा दारू विक्री, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांतर्गत ८५० हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) अंतर्गत सातत्याने गुन्हे करणाऱ्या ५२२ गुन्हेगारांसह १९० सराईत गुन्हेगारांवर याबरोबरच मोक्काअंतर्गत आठ टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एमपीडीएअंतर्गत ५८ जणांना, तर बेकायदा दारू विक्री करणाऱ्या ५३ जणांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.      

सहाशे जणांना शस्त्र जमा करण्याची नोटीस
शहरामध्ये परवानाधारक शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या सहा हजारांहून अधिक आहे. त्यामध्ये पोलिस दलातील पोलिस ठाणे, सहायक पोलिस आयुक्त व पोलिस उपायुक्त यांच्या शिफारशींनुसार शस्त्र परवान्याच्या निकषात बसणाऱ्या काही नागरिकांनाही परवाना शस्त्र दिले जाते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून मतदारांवर प्रभाव टाकला जाऊ शकतो किंवा शस्त्राचा गैरवापर केला जाऊ शकतो. म्हणून संबंधित प्रकारातील ५९१ शस्त्रे जमा करण्याची नोटीस संबंधितांना दिली आहे. त्यानुसार, त्यांनी सात दिवसांच्या आत पोलिस प्रशासनाकडे शस्त्रे जमा करणे आवश्‍यक आहे. अन्यथा त्यांच्यावर कलम १९८ नुसार गुन्हे दाखल होतील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट  केले आहे.
  
ग्रामीण पोलिसांकडूनही कारवाई 
ग्रामीण पोलिसांनी वारंवार गुन्हे करणाऱ्या ३५८ जणांवर आणि दरोड्याच्या गुन्ह्यातील ६६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर १११ जणांना तडीपार केले आहे. एमपीडीएअंतर्गत ३१ जण आणि बेकायदा दारू विक्री करणाऱ्या २३१ जणांवर कारवाई केली आहे. मोक्काअंतर्गत सहा टोळ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई  केली आहे.

निवडणुकीच्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, कोणीही शांततेस बाधा आणू नये, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल.
- मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com