मुष्टियोद्धाची लढण्याची जिद्द कायम! 

पांडुरंग सरोदे 
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षण आंदोलनावेळी चाकण येथे काही समाजकंटकांनी पोलिस नाईक अजय भापकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोक्‍यावर 52 टाके घालत डॉक्‍टरांनी त्यांचा जीव वाचविला. हल्ल्याच्या घटनेला गुरुवारी (ता. 30) महिना होत आहे. रुग्णालयातून नुकतेच बाहेर पडलेल्या भापकर यांनी आता पुन्हा त्याच धाडसाने चाकण पोलिस ठाण्यात पाऊल टाकले. "पोलिसांना जात-धर्म नसतो, समाजाचं रक्षण ते करतात; पण आम्हीही हाडामासाची माणसं आहोत,' असे सांगताना धिप्पाड देहयष्टीच्या भापकर यांच्या भावनांचा बांध अखेर फुटला! 

पुणे - चाकणच्या तळेगाव चौकात 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन शांततेत पार पडले. मात्र, त्याचवेळी काही समाजकंटकांनी तोडफोडीस सुरवात केली. कर्तव्य बजावीत असताना एकाने फेकलेली वीट भापकर यांच्या डोक्‍याला लागली. काही कळण्यापूर्वीच लोखंडी रॉड, काठ्या हाती घेतलेल्या 20-25 जणांच्या जमावाने त्यांना लक्ष्य केले. रक्‍तबंबाळ अवस्थेत भापकर यांनी बस स्थानकातील तिकीट घराचा आश्रय घेतला. त्यानंतर सहकाऱ्यांनी चाकणमधीलच जैन रुग्णालयात नेले. 

प्रकृती नाजूक बनल्याने उपचारासाठी पुण्यात खासगी रुग्णालयात हलविले. डॉक्‍टरांनी भापकर यांच्या जबड्याची तातडीने शस्त्रक्रिया केली. डोक्‍यातील जखमा खोल असल्याने 52 टाके घालण्यात आले. पंधरा दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडले. त्यानंतर चार दिवसांपासून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पोलिस ठाण्यात येण्यास सुरवात केली आहे. जबडा, हनुवटीस मार बसल्याने भापकर यांना बोलता येत नाही, तरीही ती घटना ते डोळ्यांसमोर उभी करतात. 

भापकर स्वतः मुष्टियोद्धे आहेत. पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून ते राज्यपातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत पोलिस दल मुष्टियुद्धात अनेकदा "राज्यस्तरीय चॅंपियन' ठरले. खेळाडू असल्याने त्यांची देहयष्टी धिप्पाड आहे. त्यामुळे या हल्ल्यानंतर असंख्य जखमा होऊनही त्यांनी उपचारास चांगला प्रतिसाद दिला. यापूर्वी त्यांचे 116 किलो वजन होते, या घटनेनंतर 14-15 किलोंनी वजन कमी झाले. 

त्यांचे कुटुंब अजूनही या धक्‍क्‍यातून सावरलेले नाही. आई-वडील, पत्नी, एक छोटी मुलगी व एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. भापकर, मूळचे सासवड येथील लोणी भापकर येथील असून, 2003 मध्ये ते पोलिस भरती झाले. चार वर्षांपासून ते चाकण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. भापकर यांनी चाकणमधील अनेक गुन्हेगारांवर वचक बसविलेला आहे. त्याचा राग अनेकांना होता. समाजकंटकांनी भापकर यांना जाणीवपूर्वक लक्ष केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

उपचाराचा खर्च साडेतीन लाख 
आतापर्यंत उपचारासाठी साडेतीन लाखांहून अधिक खर्च झाला आहे. त्यांच्या भावाने आत्तापर्यंतचा खर्च केला. जखमा अजूनही ओल्या आहेत, त्यामुळे उपचारासाठी आणखी खर्च होण्याची शक्‍यता आहे. पोलिस प्रशासनाची मदत अद्याप त्यांना मिळालेली नाही. कागदपत्रे जमा केल्यानंतर ठरावीक रक्कम मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: police ajay bhakar story