बाँबस्फोटाच्या ई-मेलमुळे पोलिसांची दिवसभर धावपळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

सकाळी पावणेअकरा ते दुपारी एकच्या दरम्यान आवारातील तिन्ही महाविद्यालयांच्या इमारतींची आणि परिसराची कसून तपासणी केली. परंतु, त्यात कोठेही काही सापडले नाही. संबंधित ई-मेल सायबर पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे. त्याच्या आधारे तपास सुरू आहे, अशी माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली. 

पुणे : शाहू महाविद्यालयाच्या परिसरात बॉंबस्फोट करण्याचा ई-मेल आल्यामुळे शहर पोलिसांची बुधवारी दिवसभर धावपळ उडाली. दक्षतेचा इशारा म्हणून पोलिसांनी महाविद्यालयाच्या परिसराची कसून तपासणी केली. सुदैवाने त्यात काही आक्षेपार्ह सापडले नाही. हा ई-मेल म्हणजे खोडसाळपणा असावा, असे पोलिसांनी म्हटले आहे. 

बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या मेलवर मंगळवारी सकाळी ई-मेल आला. त्यात "शाहू महाविद्यालयाच्या परिसरात बॉम्बस्फोट होणार आहे. तुम्ही काळजी घ्या,' अशा आशयाचा मजकूर होता. महाविद्यालयाच्या आवारात बुधवारी यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कला-वाणिज्य शाखेचा पदवीप्रदान कार्यक्रम होता. वानवडी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांनी याबाबतची माहिती दत्तवाडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने महाविद्यालयात धाव घेतली.

सकाळी पावणेअकरा ते दुपारी एकच्या दरम्यान आवारातील तिन्ही महाविद्यालयांच्या इमारतींची आणि परिसराची कसून तपासणी केली. परंतु, त्यात कोठेही काही सापडले नाही. संबंधित ई-मेल सायबर पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे. त्याच्या आधारे तपास सुरू आहे, अशी माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली. 

विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा घोलप म्हणाल्या, ""पदवीप्रदान कार्यक्रम सकाळी सव्वादहा वाजता सुरू झाला. त्यामध्येच पोलिसांचा ताफा आला. त्यानंतर आम्ही कार्यक्रम आवरता घेतला. प्रत्येक महाविद्यालयाच्या दहाऐवजी प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली. पाहुण्यांच्या भाषणानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या बाहेर काढून पोलिसांना तपासणीसाठी सहकार्य केले.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Alert throughout the day due to the e mail of the bomb blast