बारामती नजिक लिमटेकमध्ये डिजे वाजवण्यावरुन पोलिसांना मारहाण व धक्काबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Crime News

बारामती नजिक लिमटेकमध्ये डिजे वाजवण्यावरुन पोलिसांना मारहाण व धक्काबुक्की

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : कोरोनाचे संकट कमी होऊ लागल्याने आता लग्न समारंभही धुम धडाक्यात होत आहेत. लग्न समारंभात डीजेच्या वापरावर बंदी असतानाही विनापरवाना डीजे लावून आनंद साजरा करणे बारामती तालुक्यातील लिमटेक गावातील काही जणांच्या अंगाशी आले आहे.

शुक्रवारी (ता. 19) लिमटेक गावामध्ये रात्री दहाच्या सुमारास एका लग्नसमारंभासाठी विनापरवाना डीजे लावून काही लोक रस्त्यावर नाचत होते. रहदारीला अडथळा होत असल्याने जागरुक नागरिकांनी पोलिसांना ही माहिती कळविल्यानंतर पोलिस हवालदार विलास विठ्ठल मोरे, काळे व शेंडगे हे पोलिस कर्मचारी डीजे बंद करण्यासाठी गेले. मात्र डीजे बंद करायचा नाही या कारणावरुन स्थानिक पुरुष व महिलांनी पोलिसांशी हुज्जत घातली. स्थानिकांनी केलेल्या मारहाणीमध्ये विलास मोरे जखमी झाले. जिल्ह्यात सध्या कलम १४४ लागू आहे. याशिवाय डॉल्बी वाजविण्यासही बंदी आहे. त्यामुळे त्यांनी तेथे जात स्पिकरवरून पुकारत डॉल्बी बंद करण्यास सांगितले. डीजेसमोर त्यावेळी साठ ते सत्तर जणांचा जमाव नाचत होता. त्यामुळे रस्त्यावरील या वरातीमुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.

या प्रकरणी विनापरवाना डीजे लावण्यासह पोलिसांना धक्काबुक्की, मारहाण करणे, पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिस वाहनावर दगड मारुन काच फोडण्याचा प्रयत्न करणा-या अजय सोनवणे, अक्षय शिंदे, रोहित शिंदे, महेश खिलारे (पूर्ण नावे नाहीत, रा. लिमटेक) यांच्यासह श्रीनाथ ओम डिजिटल भिगवणचे मालक व ऑपरेटर तसेच अन्य लोकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामकाजात अडथळा आणणे, सरकारी कर्मचा-याला मारहाणीसह, बेकायदा गर्दी जमाव जमवणे, महाराष्ट्र पोलिस कायदा, मोटार वाहन कायद्यानुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विलास मोरे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी डीजेची गाडी सोबत नेण्याचा प्रयत्न केल्यावर काहींनी त्या गाडीवर दगडफेक केली, पोलिसांच्याही सरकारी गाडीवर दगड मारला. या दगडफेकीत डीजेच्या काचा काही लोकांना लागल्याचेही पोलिसांनी सांगितले. या गोंधळात डीजेची गाडी तेथून चालकाने पळवून नेली. या गोंधळात दहा ते बारा महिलाही पोलिसांच्या अंगावर धावून आल्या.

या घटनेत विलास मोरे हे जखमी झाले. त्यांना जमावातील काही लोकांनी उठवून लग्न असलेल्या भीमा मोहन सोनवणे यांच्या घरापुढे नेवून बसवले. तेथेही काहींनी येत तुमची डीजे बंद करण्याची हिम्मत कशी झाली. तुम्ही दारु पिवून येत आमच्या महिलांच्या गळ्यातील सोने काढून घेतल्याचा खोटा गुन्हा आता तुमच्यावर दाखल करू अशी धमकी मोरे यांना दिला. काही वेळात शहर पोलिस ठाण्यातून स्वतः पोलिस निरीक्षक सुनील महाडिक हे आरसीपी पथकाच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोरे यांना विचारपूस करत उपचारासाठी हलवले. या घटनेत सरकारी जीपच्या काचा फुटल्या. दरवाजा चेंबला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

loading image
go to top