तब्बल सोळा वर्षांनंतर कळले फसवणूक केली...

Tollnaka
Tollnaka

लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल वसुली नाक्‍याची जागा चुकल्याची उपरती सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल सोळा वर्षांनंतर झाली आहे. जागा परस्पर बदलून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील वाडिया टेक्‍नो इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे नाव- इंडिपेंडंट इंजिनिअर, मे. गेर्जी ईस्टर्न लिमिटेड) या कंपनीसह कंपनीच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या साहाय्यक अभियंता श्रुती प्रशांत नाईक (वय 43, रा. शनिवार पेठ, पुणे) यांनी शनिवारी (ता. 7) रात्री उशिरा लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. कवडीपाट येथील शेतकरी राहुल सोपान कदम यांनी याप्रकरणी केलेल्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला चुकीची उपरती झाली आहे. यातील विशेष बाब म्हणजे कवडीपाट टोल नाक्‍यावर सोळा वर्षांपासून चालू असलेली टोलवसुली सहा महिन्यांपूर्वी थांबवण्यात आली आहे.

पुणे- सोलापूर महामार्गावरील वाढती रहदारी लक्षात घेऊन राज्य सरकारने कवडीपाट ते कासुर्डी (यवत, ता. दौंड) या दरम्यान 25 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या तत्त्वानुसार उभारणी केली होती. हा रस्ता आयर्न टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उभारला होता. टोल वसूल करण्याच्या परवानगीनुसार, आयर्न टोल रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने या रस्त्याचे चौपदरीकरण व मजबुतीकरण केले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने कवडीपाट येथे टोलची वसुली करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या नाक्‍याची नियोजित जागा परस्पर बदलून, वाडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकारात पन्नास मीटर अंतर पुढे नेली होती. यामुळे राहुल कदम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते. याप्रकरणी राहुल कदम यांनी माहिती अधिकाराखाली तक्रार केली होती. यात वाडिया कंपनीने टोल वसुली नाक्‍याची जागा परस्पर बदलल्याचे निष्पन्न झाल्याने, संबंधित कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कवडीपाट ते कासुर्डी या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून, सोळा वर्षे टोल नाक्‍याची जागा चुकीची असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करत होतो. मात्र, काही राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली येऊन सोळा वर्षांपूर्वी टोल नाक्‍याची जागा परस्पर बदलून, आमच्यावर अन्याय केला होता. याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांमार्फत खोट्या केस करून, माझ्यासारख्याला कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचाही प्रयत्न कंपनीने केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्याने आम्हाला निम्मा न्याय मिळाला आहे. आमच्या जागेत टोलवसुली नाका उभारल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हे नुकसान बांधकाम विभागाने भरून द्यावे, यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे.
- राहुल कदम, तक्रारदार

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com