मुलींच्या वसतिगृहाजवळ चौकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाचा निर्णय; प्रखर उजेडाचे दिवेही बसविले

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींची छेडछाड झाल्याची दखल घेत विद्यापीठाने तेथे प्रखर उजेडाचे दिवे (फ्लड लाइट) आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच विद्यार्थिनींच्या वसतिगृहाजवळ सुरक्षारक्षकांची चौकीही उभारणार आहे.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाचा निर्णय; प्रखर उजेडाचे दिवेही बसविले

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रात्रीच्या वेळी विद्यार्थिनींची छेडछाड झाल्याची दखल घेत विद्यापीठाने तेथे प्रखर उजेडाचे दिवे (फ्लड लाइट) आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच विद्यार्थिनींच्या वसतिगृहाजवळ सुरक्षारक्षकांची चौकीही उभारणार आहे.

विद्यापीठातील टपाल कार्यालयाकडून विद्यार्थिनींच्या वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास एका तरुणाने विद्यार्थिनीला अडवून तिची छेडछाड केली होती. तिने प्रसंगावधान राखत जोरात ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे खडकी गेटकडून येणाऱ्या अमोल सरोदे या विद्यार्थ्याने आवाजाच्या दिशेने त्याची दुचाकी वळविली. त्यानंतर छेड काढणारा तरुण झाडांमधून पळून गेला.

सरोदे हा "ढापसा' या विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलविल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. या प्रकाराची दखल घेत विद्यापीठाने आता या रस्त्यावर आज मोठ्या क्षमतेचे विजेचे दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

सुरक्षारक्षकांची कमतरता
विद्यापीठात दाट झाडी, मोकळा परिसर असल्याने त्याचा वापर लपण्यासाठी करून मुलींना छेडण्याचे प्रकार घडत आहेत. पहाटे फिरायला जाणाऱ्या महिलांनाही त्रास देण्याचे प्रकार येथे घडले आहेत. धोबी घाटाची बाजू आणि पड्याळ वस्ती या बाजूच्या भिंती भक्कम राहिलेल्या नाहीत. त्या भागाकडून गुंड प्रवृत्तीचे तरुण आत येऊन हे प्रकार करत असावे, असा सुरक्षा विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे विद्यापीठात सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याचे समोर आले आहे.

संरक्षक भिंती भक्कम करणार
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू म्हणाले, 'विद्यार्थिनींच्या सुरक्षेची सर्व खबरदारी घेत आहोत. त्यासाठी परिसरात सीसीटीव्ही आणि दिव्यांचे जाळे आहेच; परंतु ज्या ठिकाणी छेडछाडीचा प्रकार घडला, त्या रस्त्यावर प्रखर उजेडाचे दिवे बसविले आहेत. तेथे सुरक्षारक्षकांची चौकी उभारणार आहोत. असे प्रकार घडण्याची शक्‍यता आहे, ती ठिकाणे शोधून तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि उच्चक्षमतेचे दिवे बसविण्यास सुरवात केली आहे. विद्यापीठात अवेळी येणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी संरक्षक भिंती अधिक भक्कम करण्याचे कामही सुरू होईल.''

Web Title: police chowki near to girls hostel