कुंटणखान्यातून अठरा तरुणींची सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

पुणे - तरुणींना खोल्यांमध्ये डांबून जबरदस्तीने शरीरविक्रय करण्यास भाग पाडले जात असल्याच्या कारणावरून फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतील कुंटणखान्यात शुक्रवारी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. १८ तरुणींची सुटका करून आठ ते नऊ जणांना अटक केली.

पुणे - तरुणींना खोल्यांमध्ये डांबून जबरदस्तीने शरीरविक्रय करण्यास भाग पाडले जात असल्याच्या कारणावरून फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतील कुंटणखान्यात शुक्रवारी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. १८ तरुणींची सुटका करून आठ ते नऊ जणांना अटक केली.

जहाना मोहम्मद शेख, रूपा अब्दुल खान, मैली टिकातमांग, तारा बकतलमांग, शिमला साथमनथमांग, यास्मीन मोबीन शेख, काजल गोरेतमांग, गंगुबाई कांबळे (सर्व रा. बुधवार पेठ) अशी अटक केलेल्या घरमालक व व्यवस्थापक महिलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार व शुक्रवार पेठेतील काही कुंटणखान्यांमध्ये तरुणींना डांबून ठेवून जबरदस्तीने शरीरविक्रय करून घेतला जात असल्याची खबर परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तरुणींच्या सुटकेसाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्याचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ पोलिस अधिकारी व ७० पोलिस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन राबविले.

यादरम्यान पोलिसांनी दोन्ही पेठांच्या मध्यवर्ती भागातील कुंटणखाने पिंजून काढले. त्यामध्ये १८ तरुणींकडून जबरदस्तीने शरीरविक्रय करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. घरमालक व व्यवस्थापक यांच्याकडून तरुणींना मिळणाऱ्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम घेतली जात असल्याचे एका तरुणीने सांगितले. पीडित तरुणींना न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस संरक्षणात रेस्क्‍यू फाउंडेशनमध्ये पाठविण्याचे आदेश दिले.

तरुणींच्या इच्छेविरुद्ध शरीरविक्रयचा प्रकार संबंधित ठिकाणी सुरू होता. पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली होती. शुक्रवारची कारवाई मोठी होती. यापुढेही सातत्याने कारवाई सुरूच राहील. तेथे अल्पवयीन मुली व नव्याने तरुणी आणणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. 
- सुहास बावचे,  पोलिस उपायुक्त, परिमंडल एक

Web Title: Police Combing Operation on Wednesday in Budhwarpeth

टॅग्स