पूजा चव्हाण प्रकरणातील तपासाच्या प्रश्‍नावर पोलिस आयुक्तांचे 'हास्य' उत्तर! 

Police Commissioner amitabh gupta Pooja Chavan Death Case
Police Commissioner amitabh gupta Pooja Chavan Death Case

पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येच्या घटनेस 22 दिवस उलटल्यानंतरही पुणे पोलिस अजूनही त्याविषयी गंभीर नसल्याचे मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिस ठाण्याच्या पातळीवरही उदासीनता असताना पत्रकार परिषदेत पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा तपास कुठपर्यत आला आहे, असा प्रश्‍न पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारल्यानंतर आयुक्तांनी स्मितहास्य करीत पत्रकार परिषदेतूनच काढता पाया घेतला. त्यामुळे या प्रकरणामध्ये पुणे पोलिस अजूनही गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. 

पूजा चव्हाण हिने 7 फेब्रुवारीला मध्यरात्री वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पूजाशी संबंध असल्याच्या कारणावरुन भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर राठोड यांनी राजीनामा देण्यापर्यंतची घटना घडली. 

या प्रकरणावरुनच पुणे पोलिसांनाही भाजपनेही चांगलेच लक्ष्य केले आहे. संपुर्ण राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागलेले असतानाच पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत अकस्मात मृत्यू नोंद, जबाब नोंदणी, महिला आयोगासह राज्याच्या पोलिस आयुक्तांना चौकशी अहवाल पाठविणे, यापलिकडे तपास केला नसल्याची सद्यस्थिती आहे. 

वाचा - थरार! काही कळण्यापूर्वीच भररस्त्यात तरुणावर धारदार शस्त्राने वार, उपचारापूर्वीच सोडला जीव

दरम्यान, लष्कर भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. संबंधित परिषदेमध्ये आयुक्त गुप्ता यांना पत्रकारांनी पूजा चव्हाणच्या मृत्युचा तपास कुठपर्यंत आला आहे, सविस्तर शवविच्छेदन अहवाल नेमके काय नमूद केले आहे, यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी आयुक्त गुप्ता यांनी या प्रकरणावर बोलणे तर टाळले.त्याशिवाय तत्काळ पत्रकार परिषद संपवून हसतमुख चेहऱ्याने तेथून काढता पाया घेतला. 

पूजा चव्हाण प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची भुमिका संशयास्पद असल्याची तसेच पोलिस गंभीर नसल्याची टिका आत्तापर्यंत विरोधी पक्षांकडून केली जात होती. विशेषतः वानवडी पोलिसांकडून संबंधीत प्रकरणामध्ये कुठलाही तपास केला जात नसल्याचे, किंवा तपासाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली जात नसल्याचे, उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप यापुर्वीच करण्यात आला आहे. त्यातच खुद्द आयुक्तांनीच या प्रकरणासंबंधी प्रश्‍नावर चेहऱ्यावर हास्य आणून या प्रकरणाचे पुणे पोलिसांना किती गांभीर्य आहे, यावर शिक्कामोर्तब केले. 

वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षेत तोतयागिरी, पाच जणांना पोलिस कोठडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com