आयुक्‍तालयासाठी जागा निश्‍चित?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पिंपरी - पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्यासाठी तात्पुरती जागा निश्‍चित झाली आहे. चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा या महापालिकेच्या इमारतीची मागणी पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र दिनापासून पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मात्र, त्याबाबतचा अध्यादेश निघाला नसल्याने १ मे चा मुहूर्त चुकणार, अशी चर्चा पोलिस वर्तुळात होती.

पिंपरी - पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्यासाठी तात्पुरती जागा निश्‍चित झाली आहे. चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा या महापालिकेच्या इमारतीची मागणी पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र दिनापासून पोलिस आयुक्‍तालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मात्र, त्याबाबतचा अध्यादेश निघाला नसल्याने १ मे चा मुहूर्त चुकणार, अशी चर्चा पोलिस वर्तुळात होती.

आयुक्‍तालयाकरिता प्राधिकरणाची जुनी इमारत (सध्याचे फ प्रभाग कार्यालय), प्राधिकरणाची नवीन इमारत, हेडगेवार भवन आणि प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले विद्यालय या जागांची पाहणी करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सायंकाळनंतर जागेबाबतची चक्रे वेगाने फिरली. पाहिलेल्या जागेपैकी महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळेची इमारत ही जागा उपायुक्‍तांनी निश्‍चित केली. ही जागा किती दिवसात उपलब्ध होऊ शकते, इमारतीच्या भाड्याचा शासकीय दर काय, कार्यालयाकरिता फर्निचर उपलब्ध होऊ शकते काय, आदी विचारणा करणारे पत्र उपायुक्‍तांनी पालिकेस पाठविले आहे.

तयारीही सुरू
विद्यालयाच्या आवारात पार्किंगकरिता मोठी जागा आहे. याशिवाय शाळेची इमारत ही तळमजला अधिक दोन मजले अशी आहे. या इमारतीमध्ये १८ खोल्या व एक हॉल आहे. यामुळेच येथील जागेला पोलिसांनी पसंती दिली.
पोलिस आयुक्‍तालयाकरिता येथील जागेला पोलिसांनी पसंती दिल्याचे ब क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना अधिकृतरीत्या कळविले नसले तरी, ठेकेदाराला बोलावून त्यांनी फर्निचर करण्याची तयारी केली असल्याचे सांगितले.

वाईट वाटते, पण समाधानही
प्रेमलोक पार्क परिसरात खेळण्यासाठी एक छोटे उद्यान आहे. मात्र आसपासचे रहिवासी खेळू देत नाहीत. यामुळे मुलांना खेळण्यासाठी येथील शाळेच्या मैदानाचा आसरा घ्यावा लागतो. अनेकदा शिक्षक रागावतात, असे अजय मुथा या मुलाने सांगितले. नवीन सायकल चोरीला गेल्याने खूप वाईट वाटले होते. आता मात्र पोलिस आयुक्‍तालय होणार असल्याने चोऱ्यांना आळा बसेल, अशी भावना संजय मोरे याने व्यक्त केली.

आमच्या शाळेचे काय होणार?
पो लिस आयुक्‍तालयाकरिता शाळेच्या इमारतीची मागणी पोलिसांनी महापालिकेकडे केली आहे. मात्र, शाळेत शिकणाऱ्या ६५० मुलांचे काय, असा प्रश्‍न शिक्षकांनी विचारला आहे.

थेरगाव, लिंकरोड, वेताळनगर, विजयनगर आदी परिसरातील मुले या शाळेत शिकण्यासाठी येतात. शाळेचा पट ६५०च्या वर आहे. चिंचवडगावात वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने प्रेमलोकपार्क येथील शाळेची इमारत या शाळेला दिली. थेरगावमधून हे अंतर जास्त असले तरी पालकांनी हा बदल स्वीकारला.

बालवाडी ते आठवीपर्यंतच्या वर्गांना सध्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील १४ खोल्या देण्यात आल्या आहेत, तर तळमजल्यावर खासगी प्राथमिक शाळेचे वर्ग भरतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात आणखी खोल्यांची आवश्‍यकता भासणार आहे. ही शाळा आता दळवीनगरमधील पांढारकर वस्तीजवळील शाळेत स्थलांतरित केली जाणार आहे. आसपासचा परिसर झोपडपट्टीचा असल्याने पालक आणि शिक्षकांचा येथील जागेला विरोध आहे. याशिवाय रेल्वे ट्रॅकही जवळ असल्याने अपघाताची शक्‍यताही नाकारता येत नाही. 

यामुळे आमची शाळा आहे तिथेच ठेवावी. पोलिस आयुक्‍तालयाकरिता अन्य जागेचा पर्याय शोधावा, असे पालक आणि शिक्षकांचे म्हणणे आहे.

शाळेची इमारत पोलिस आयुक्‍तालयाकरिता दिली असल्याचे महापालिकेने आम्हाला कळविलेले नाही. मात्र, मुलांच्या सोयीसाठी शाळेची हीच इमारत योग्य आहे.
- कल्पना चव्हाण, मुख्याध्यापिका

Web Title: police Commissionerate place