पोलिस आयुक्तालयाच्या कामांची आयुक्तांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू होण्याचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांची सोमवारी पाहणी केली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू होण्याचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांची सोमवारी पाहणी केली.

ऑटो क्‍लस्टर येथील इमारतींमध्ये पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे आणि पोलिस उपायुक्त (मुख्यालय) विनायक ढाकणे यांची कार्यालये असणार आहेत; तर पोलिस उपायुक्त परिमंडळ तीन येथील कार्यालयात पोलिस उपायुक्त नम्रता पाटील आणि स्मार्तना पाटील यांची कार्यालये असणार आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात नियंत्रण कक्ष असणार आहे. या सर्व कामांची पाहणी पोलिस आयुक्तांनी सोमवारी केली; तसेच ऑटोक्‍लस्टर येथे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली.अध्यादेशात मंजूर झालेली पदे आणि प्रत्यक्षात हजर असलेले मनुष्यबळ यांचा आढावा आयुक्तांनी घेतला. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झालेले १७ पोलिस निरीक्षकही आयुक्तांसमोर हजेरी लावत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची जोरदार तयारी सुरू असतानाच पोलिस आयुक्त आणि उपायुक्त यांच्यासाठी निवासस्थानाची शोधमोहीम सुरू आहे. या अधिकाऱ्यांसाठी प्राधिकरण परिसरात रिकाम्या बंगल्याचा शोध पोलिस घेत आहेत.

ग्रुपवरून सूचना
पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कामाची विभागणी करून दिली आहे. कामाबाबत काही अडचणी आल्यास त्या मांडण्यासाठी सहायक आयुक्तांपासून पुढील अधिकाऱ्याचा व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे अधिकाऱ्यांना आयुक्त सूचना करतात.

Web Title: Police Commissionerate work commissioner watching