..आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले तरुणाचे प्राण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police constable Saddam Sheikh save youth life pune

..आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले तरुणाचे प्राण!

पुणे : शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजताची वेळ. गस्तीवर असलेल्या पोलिस शिपाई सद्दाम शेख व अजित पोकरे यांना एक तरुण ओढ्याच्या पाण्यात आत्महत्या करीत असल्याची खबर मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता दोघेही बागुल उद्याना जवळच्या ओढ्याजवळ पोचले. शेख यांनी ओढ्याच्या पाण्यात उभ्या राहिलेल्या तरुणाला पाण्यात उतरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने शेख यांना धक्का देऊन पाण्यात उडी मारली, शेख यांनीही जीवाची पर्वा न करता क्षणार्धात १० फूट पाण्यात उडी मारून, पुढे १०-१५ मीटर वाहत जाऊन तरुणाला पाण्याबाहेर काढत त्याचे प्राण वाचविले आणि ओढ्याभोवती जमलेल्या शेकडो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला !

एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे वाटणारा आणि अंगावर अक्षरशः शहारे उभे करणारा हा प्रसंग शुक्रवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता बागुल उद्यान परिसरात घडला. पोलिस शिपाई सद्दाम शेख व पोलिस शिपाई अजित पोकरे हे दोघेही दत्तवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी दोघेहीजण गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस नियंत्रण कक्षातून " एक व्यक्ती ओढ्याच्या पाण्यात आत्महत्या करण्यासाठी जात आहे" अशी खबर देण्यात आली. दोघांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ बागुल उद्यान परिसरातील ओढ्याकडे धाव घेतली. संततधार पावसामुळे ओढ्याला पाणी वाढले होते. तर ओढ्याच्या मध्यभागी पाण्यात एक तरुण उभा होता. शेख व पोकरे यांनी त्यास बाहेर जाण्यास सांगितले, मात्र तो बाहेर येत नव्हता. अखेर पोकरे यांनी दिलेली वायर धरून शेख पाण्यात उतरले, त्यांनी तरुणाला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तरुणाने त्यांच्या हातातून निसटून पाण्यात उडी घेतली. त्यानंतर तरुण पाण्यात वाहून जाऊ लागला. तेव्हा, शेख यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, वेगवान पाण्यात उडी घेऊन १०-१५ मीटर वाहत जात पुन्हा तरुणाला पकडले. त्यानंतर त्यास हळूहळू पाण्याबाहेर आणून लोकांकडे ढाकलले, तेव्हा तेथे थांबलेल्या पोलिस शिपाई पोकरे व नागरिकांनी तरुणास पकडुन बाहेर आणले. त्यानंतर दोघांनी तरुणास पोलिस ठाण्याला आणून, त्याची समजूत काढून त्याच्या कुटुंबीयच्या ताब्यात दिले. दरम्यान पोलिस शिपाई शेख व पोकरे यांनी केलेल्या कामाचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.

Web Title: Police Constable Saddam Sheikh Save Youth Life Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..