सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्‍या 

सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्‍या 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील परिमंडळ एकच्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात येत असून, सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपार व महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. परिमंडल एकमधील दहा जणांना तडीपार करण्यात आले असून, 17 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव पोलिस उपायुक्‍त स्मार्तना पाटील यांच्याकडे सुनावणीसाठी पाठविले आहेत. 

"गणेशोत्सवानंतर गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळणार,' असे पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्यांना गुन्हेगारांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिमंडल एकमधील निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी-भोसरी, दिघी, आळंदी आणि चाकण पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील मारामारी आणि प्रॉपर्टी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या दोनशे गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. 

गणेशोत्सवानंतर यादीतील संशयित गुन्हेगारांच्या घरी जाऊन रात्रपाळीवरील पोलिस अधिकारी चौकशी करू लागले आहेत. सध्या तो गुन्हेगार काय काम करतो, दिवसभर कुठे असतो, त्याच्याकडे पैसे कोठून येतात, त्यांचे मित्र कोण, याची माहिती ते घेतात. या चौकशी सत्रामुळे गुन्हेगार आणि त्याचे कुटुंबीय घाबरून गेले आहेत. काही गुन्हेगारांच्या शेजाऱ्यांना त्याच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती नसते, त्यांचे खरे स्वरूप शेजाऱ्यांना कळू लागल्याचे पोलिसांनी सांगितले. वारंवार गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी अद्ययावत करीत आहोत. काहीजणांच्या नावांची भर यादीत पडण्याची शक्‍यता आहे. या गुन्हेगारांची तपासणी पोलिस अधिकारी करीत आहेत. वारंवार होणाऱ्या तपासणीला कंटाळून काही गुन्हेगार स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होत आहेत. त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. 
- स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्‍त-परिमंडल एक 
 

पोलिस ठाणे गुन्हेगारांची संख्या 
निगडी 30 
पिंपरी 38 
चिंचवड 22 
भोसरी 37 
एमआयडीसी 35 
दिघी 23 
आळंदी 22 
चाकण 15 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com