esakal | Pune : सिंहगड रस्ता परिसरातील अवैध धंद्यांना पोलिसांकडून अभय
sakal

बोलून बातमी शोधा

police

Pune : सिंहगड रस्ता परिसरातील अवैध धंद्यांना पोलिसांकडून अभय

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी: सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड फाटा, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे या ठिकाणी सध्या अवैध धंदे तेजीत सुरू असून स्थानिक पोलीस प्रशासनाचे या अवैध धंद्यांना अभय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा: रेल्वेकडून कोरोना नियमावलीत वाढ; सतर्क राहा अन्यथा भरावा लागेल दंड

सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या गावांमध्ये पावडर पासून बनवलेली बनावट ताडी, गावठी दारू, गुटखा, गांजा, अशा अमली पदार्थांची राजरोसपणे विक्री सुरू असून ऑनलाईन मटका, जुगार असे अवैध धंदेही सुरू आहेत. भर वस्तीत असे अवैध धंदे सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, मात्र यात पोलीसच सामील असल्याने तक्रार करायची कोणाकडे?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच अवैध व्यावसायिकांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत.

नशेच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलांच्या प्रमाणात वाढ

ताडी, गावठी दारू, गांजा हे नशा करण्याचे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलांध्ये नशा करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. तसेच मारहाण करणे, घातक शस्त्र बाळगणे, वाहणांची तोडफोड करुन दहशत निर्माण करणे असे प्रकार वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे अशा गुन्ह्यांमध्ये पंधरा ते वीस या वयोगटातील नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे.

हेही वाचा: Drug case: अचित कुमारला ९ ऑक्टोबरपर्यंत कोठडी

जीवघेण्या 'ताडी'चे जाळे उध्वस्त करणे गरजेचे

2017 पासून ताडी विक्रीला शासनाने बंदी घातलेली आहे. मात्र बनावट ताडीची विक्री राजरोसपणे सुरू आहे. क्लोरल हायड्रेट या पावडर पासून तयार करण्यात येत असलेली ही बनावट ताडी जीवघेणी आहे. पावडर तयार करणारी कंपनी ते त्यापासून ताडी तयार करुन विकणारे अवैध व्यावसायिक हे खुप मोठे जाळे असून त्यामाध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल सुरू आहे. याबाबत सखोल तपास करुन हे जाळे उध्वस्त करणे आवश्यक आहे.

"23 नोव्हेंबर 2020 मध्ये किरकटवाडी गावातील एका दुकानावर छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला होता परंतु कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लाच घेऊन दुकानदाराला सोडून दिले. याची तक्रार वरिष्ठांकडे केली असता गेले वर्षभर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सर्व पुरावे दिले असता कारवाई का होत नाही हे समजत नाही. पोलिस प्रशासन अवैध धंद्यांच्या बाबतीत केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नाही. परिसरातील अवैध धंद्यांना पोलिसांचेच पाठबळ असल्याचे जाणवते."

-प्रशांत हगवणे, नागरिक किरकटवाडी.

"शहर हद्दीत जुगार चालतो त्याचे कलेक्शन ग्रामीण हद्दीत होत असल्याची माहिती मिळाली असून त्यानूसार आमचा शोध सुरू आहे व लवकरच कारवाई होईल. इतर अवैध धंद्यांबाबत जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. कोणत्याही अवैध धंद्याला पोलीसांचे अभय नाही."

-सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

loading image
go to top