अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी

संतोष शेंडकर
सोमवार, 28 मे 2018

सोमेश्वरनगर (पुणे) : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी संभाजी पोपट शेंडकर या नराधमास आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

सोमेश्वरनगर (पुणे) : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी संभाजी पोपट शेंडकर या नराधमास आज बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

संभाजी पोपट शेंडकर (वय 43 वर्ष रा. करंजेपूल ग्रामपंचायतीअंतर्गत शेंडकरवाडी ता. बारामती जि. पुणे) या ट्रक ड्रायव्हर असलेल्या विकृत व्यक्तीने येथील परिसरातील एका वस्तीवरील अकरा वर्षीय मुलीवर शनिवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री अकराच्या दरम्यान दोन ठिकाणी लैंगिक अत्याचार केला होता. यानंतर सीसीटीव्ही यंत्रणेतील फुटेज आणि गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला काल दुपारी केडगाव रेल्वेस्टेशन (ता. दौंड) येथून ताब्यात घेतले. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला अलगद जाळ्यात पकडले. काल ग्रामपंचायत निवडणुकांचा ताण असतानाही पोलिसांनी सात तासात केलेल्या या यशस्वी कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे. 

आज या नराधमास बारामतीच्या जिल्हा न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश ए. एम. राजकारणे यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने प्रकरण गांभीर्याने घेत पुढील तपासासाठी शेंडकर याला 30 मे पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा यासह अपहरण व बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी पुढील तपास करत आहेत. आरोपी ट्रक ड्रायव्हर असून त्याच्यावर दारू पिऊन वाहन चालविणे, सरकारी कामात दबाव आणणे असे गुन्हे दाखल असल्याचे बापू बांगर यांनी सांगितले आहे. दरम्यान, सदर आरोपीने यापूर्वी एकदा ऊस तोड कामगारांच्या मुलीस उचलून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता अशी माहितीही लोकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.   

Web Title: police custody to accused who raped minor girl