झेब्रा क्रॉसिंगवर थांबूनही पोलिस कारवाई नाही 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे - "लाल सिग्नलला चौकात अनेक जण झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबतात. झेब्रा क्रॉसिंगवर थांबणाऱ्यांवर पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे आम्ही पुढे येऊन थांबतो,' अशा आश्‍चर्यजनक प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी व्यक्‍त केल्या. मात्र, वाहतुकीचे नियम आम्ही कसे मोडतो, याचे समर्थन करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी टिपली. 

पुणे - "लाल सिग्नलला चौकात अनेक जण झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबतात. झेब्रा क्रॉसिंगवर थांबणाऱ्यांवर पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे आम्ही पुढे येऊन थांबतो,' अशा आश्‍चर्यजनक प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी व्यक्‍त केल्या. मात्र, वाहतुकीचे नियम आम्ही कसे मोडतो, याचे समर्थन करणाऱ्या वाहनचालकांची छायाचित्रे रोटरी क्‍लबच्या सदस्यांनी टिपली. 

"रोटरी क्‍लब ऑफ पुणे लोकमान्यनगर' यांच्या वतीने गुरुवारी सकाळी दांडेकर पूल चौकात वाहतूक अभियान राबविण्यात आले. रोटेरियन्सनी सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत या चौकातील स्थितीचा आढावा घेतला. "रोटरी क्‍लब ऑफ पुणे ईस्ट'चे अध्यक्ष आणि वाहतूक अभियानाचे प्रकल्प संयोजक दिलीप देशपांडे, "रोटरी क्‍लब ऑफ पुणे लोकमान्यनगर'चे अध्यक्ष विलास रवांडे, यूथ डायरेक्‍टर मीना साने, सचिन समळ, उदय कुलकर्णी, शरद लागू आदी या वेळी उपस्थित होते. 

सिंहगड रस्ता, स्वारगेट आणि शास्त्री रस्त्याला जोडणारा हा चौक. या चौकात सकाळी-सायंकाळी वाहनांची वर्दळ असते. देशपांडे यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे येऊन थांबलेल्या वाहनचालकांशी संवाद साधला. त्या वेळी दुचाकीस्वार गणेश म्हणाला, ""सगळेच झेब्रा क्रॉसिंगवर थांबतात. त्यांच्यावर पोलिस कारवाई करीत नाहीत. त्यामुळे आम्ही पुढे येऊन थांबतो.'' योगेश मोरे म्हणाला, ""मोठ्या वाहनांमुळे सिग्नल दिसत नाहीत. महापालिकेने सिग्नल उंचीवर बसवावेत आणि तो किती सेकंदांचा आहे, हे समजण्यासाठी तांत्रिक दुरुस्ती करावी.'' 

दांडेकर पूल चौकात नोंदविलेली निरीक्षणे : 

- सहाआसनी रिक्षा थांबलेल्या असतात. त्यामुळे चौकात वाहतूक संथ 

- जनता वसाहतीकडून येणाऱ्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टेच नाहीत 

- चौकात अन्य ठिकाणीही झेब्रा क्रॉसिंग पुसटच 

- विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक 

- सुरक्षिततेसाठी वाहनचालकांना प्रशिक्षणाची गरज 

- हिरवा सिग्नल पडण्यापूर्वीच वाहनचालकांची पुढे जाण्यासाठी धावपळ 

 

वाहतूक पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंगवर थांबणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केल्यास वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच वाहने उभी करतील. जेणेकरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सोपे आणि सुरक्षित होईल. 

- दिलीप देशपांडे,  प्रकल्प संयोजक, रोटरी वाहतूक अभियान.

Web Title: The police did not take action to stop the zebra crossing