पोलिसांकडून तक्रारींना केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

खासगी वाहनांविरोधात एसटी प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्यांना केराची टोपली दाखवीत आहेत.

पुणे - शहरातील एसटी बसस्थानके खासगी वाहनांच्या विळख्यात अडकली असताना पोलिस त्याकडे  सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. खासगी वाहनांविरोधात एसटी प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्यांना केराची टोपली दाखवीत आहेत. यावरून खासगी वाहतूकदारांबाबत पोलिस एवढे मेहेरबान का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन बसस्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. स्थानकातील प्रवासी पळविण्यासाठी स्थानकाला खासगी वाहतूकदारांचा वेढा पडलेला असतो. हे वाहतूकदार एजंटांमार्फत थेट स्थानकातून प्रवासी पळवितात. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. याबाबत एसटी प्रशासनाने स्थानिक पोलिसांकडे तक्रार देऊनही अशा बेकायदा खासगी वाहतुकीवर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवत नसल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

न्यायालयाच्या आदेशाला ठेंगा 
मुंबई उच्च न्यायालयाने एसटी बसस्थानकाच्या दोनशे मीटर परिसरामध्ये खासगी वाहतुकीस बंदी घातली आहे. या बंदीची अंमलबजावणी स्थानिक पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, पोलिसांकडून न्यायालयाच्या या आदेशाचे पालन केले जात नाही. त्याचा फटका एसटीच्या महसुलावर होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बसस्थानकातील खासगी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडे वारंवार तक्रारी करण्यात 
येत आहेत. मात्र पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नाही. 
- प्रदीपकुमार कांबळे, आगारप्रमुख, स्वारगेट बसस्थानक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police do not take any action despite complaints from private vehicles against private vehicles