देहूरोडमध्ये शिस्तीसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू

मुकुंद परंडवाल
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

देहू - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेत देहू आणि देहूरोडचा पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतून शहरी पोलिस हद्दीत समावेश झाला. त्यामुळे देहूरोड शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या आणि गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिसांनी कंबर कसली आहे.

देहू - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेत देहू आणि देहूरोडचा पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतून शहरी पोलिस हद्दीत समावेश झाला. त्यामुळे देहूरोड शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या आणि गुन्हेगारी आटोक्‍यात आणण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिसांनी कंबर कसली आहे.

गेल्या आठवड्यात कोंबिंग ऑपरेशन करून झोपडपट्टीतील ३३ लिस्टवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले. वाहतूक शाखेकडून शहरातील दुकानदार, पथारीवाले, टपरीधारक, हातगाडीवाल्यांची बैठक देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात बोलविण्यात आली. मात्र, या बैठकीला स्थानिक देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाने योग्य प्रतिसाद न दिल्याने पोलिसांचे प्रयत्न फसल्याची शहरात चर्चा आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गेली अनेक वर्षे सहवासात असलेल्या देहूरोड येथील नागरिकांना शिस्तीची सवय लागणार की नाही, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मावळ, खेड, हवेली, मुळशी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक ग्राहक देहूरोडमध्ये खरेदीसाठी येतात. मात्र शहरात योग्य अशी वाहनव्यवस्था बोर्डाच्या स्थापनेपासून नाही. हातगाडीवाले, पथारीवाले, टपरीवाले यांनाही नियम नाहीत. जो तो रस्त्यावर हातगाडी लावून, फुटपाथवर दुकाने थाटून व्यवसाय करीत आहे. स्थानिक युवक तर भर रस्त्यावर दुचाकीवरून हॉर्न वाजवत, हातात काठ्या, तलवारी घेऊन दहशत माजविण्यात पटाईत आहेत. अनधिकृत झोपडपट्यांची संख्याही वाढत आहे. गुन्हेगारीचे माहेरघर अशी देहूरोड शहराची ओळख आहे. 

नव्याने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तांना देहूरोड म्हणजे मिनी इंडिया, हे एक आव्हान आहे. पूर्वी पोलिसांची संख्या कमी म्हणून अनेक गुन्हेगारीच्या घटनांकडे डोळेझाक करण्यात आली. आता मात्र पोलिस अधिकाऱ्यांना प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. वरिष्ठ कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने देहूरोड आणि देहूकडे लक्ष द्यावे लागणार आहे. याचाच एक भाग म्हणून बोलविलेल्या बैठकीला स्थानिक बोर्डाचे अधिकारी अनुपस्थितीत राहिल्याने राजकीय पक्षाने त्याचे भांडवल केले.

या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि देहूरोड शहर सुंदर बनविण्यासाठी नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे. शिस्तीचा बडगा दाखविणाऱ्या पोलिसांना सहकार्य करण्यासाठी देहूरोडकरांनी पुढे आले पाहिजे. नवीन वर्षाच्या आगमनाबरोबर नव्याने झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला सहकार्य करण्यासाठी शहरातील व्यापारी, राजकीय नेते आणि युवकांनी पुढे आले पाहिजे. सतत गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या देहूरोडची नवीन शिस्तीचे शहर म्हणून ओळख करून देण्याचे आव्हान सध्या आहे. त्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विविध उपाययोजनांना सहकार्य देहूरोडकरांनी करणे गरजेचे आहे.

Web Title: Police efforts to discipline Dehurod continue