पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध दहा गुन्हे दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीदरम्यान कोथरूड येथे रास्ता रोको करून पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी 770 जणांना आरोपी केले आहे, तर 45 जणांना अटक केली आहे. 

पुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीदरम्यान कोथरूड येथे रास्ता रोको करून पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दहा गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी 770 जणांना आरोपी केले आहे, तर 45 जणांना अटक केली आहे. 

पोलिसांवरील दगडफेकीच्या पहिल्या गुन्ह्यात पोलिस निरीक्षक सत्यवान पाटील यांनी, तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक पी. एन. जर्दे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून कोथरूड पोलिसांनी 45 जणांना अटक केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला बंद संपल्यानंतर संबंधित आरोपींनी बेकायदेशीररीत्या जमाव जमवून पौड रस्ता बंद केला होता. पोलिसांनी संबंधितांना ध्वनिक्षेपकाद्वारे तेथून जाण्याचा आदेश दिला होता. त्यानंतरही जमावाने मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करून पोलिसांकडे दुर्लक्ष केले. 

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना उचलून बाजूला काढण्यास सुरू केले. त्या वेळी जमावाने अचानक त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरवात केली, तर काहींनी काचेच्या बाटल्या फेकून मारल्या. यामध्ये एका बससह काही खासगी वाहनांच्या काचा फुटून 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या एका टाटा सुमो गाडीची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे 20 हजार रुपयांचे नुकसान केले. 

जर्दे यांनी फिर्याद दिलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात 19 जणांना अटक केली आहे; तर शेकडो जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये लोकमान्य वसाहतीजवळ जमावाने रस्त्यावर टायर जाळले. तसेच, महापालिकेच्या स्मार्टसिटीअंतर्गतच्या प्रकल्पातील सायकली पेटवून दिल्या. याबरोबरच मेट्रोच्या कामासाठी आणलेले साहित्य रस्त्याच्याकडेला टाकून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाने तेथे कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगड, बाटल्या फेकून त्यांना जखमी केले होते. 

Web Title: Police filed ten cases against the stone attackers