शिरोली बुद्रुकच्या मनोरुग्णांना पोलिसांनी हलविले

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

जुन्नर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील शिवऋण प्रतिष्ठानच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या मनोरुग्ण संगोपन संस्थेतील ५३ मनोरुग्णांना आज (शुक्रवार) हलविण्यात आले. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे पुढील व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या संस्थेच्या चालकाविरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

शिरोली बुद्रुक गावच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या संस्थेने ग्रामपंचायत प्रशासनाकडे संस्थेच्या कामकाजाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच या संस्थेत दाखल करण्यात आलेल्या मनोरुग्णांच्या आकस्मिक मृत्यूबाबत कोणतीही माहिती न देता त्यांचे मृतदेहावर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीत परस्पर अंत्यसंस्कार केल्याचे तसेच सदर रुग्णांच्या मृत्यूची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नसल्याची माहिती ग्रामपंचायतीने जुन्नर पोलिसांना दिल्याने जुन्नर पोलिस ठाण्याच्या वतीने सदर संस्थेची पहाणी करण्यात आली.

यावेळी सदर संस्थेकडे मनोरूग्णांना सांभाळण्यासाठी लागणारे योग्य व्यवस्थापन नसल्याचे स्पष्ट दिसून आले. तसेच वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित केअरटेकर नसल्याचे आढळून आले. संस्था व्यवस्थापनाने सदर संस्थेची कोणत्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्रे दाखविण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे सदर संस्था ही बेकायदेशीरपणे चालविली जात असल्याचे निदर्शनास आल्याने जुन्नर पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

या संस्थेतील ४० पुरुष, ५ मुले, ५ महिला व त्यांची तीन लहान बालके अशा एकूण ५३ जणांना जुन्नर पोलिसांकडून मोठ्या बंदोबस्तात हलविण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे योग्य ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Police has sent psychologues of Shiroli Budruk