वर्षात सतराशे जणांची ‘घरवापसी’

पांडुरंग सरोदे 
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पुणे पोलिसांच्या ‘मनुष्य मिसिंग सेल’ने या मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला पालकांकडे सुखरूप सुपूर्त केले. यासारख्या गुन्ह्यांसह बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून समांतर तपासाचा अवलंब केला जात आहे. मिसिंग सेलच्या माध्यमातून पोलिसांनी मागील वर्षभरात १७०० जणांचा शोध घेतला आहे.

पुणे - हडपसर परिसरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने पळवून नेले. याबाबत तक्रार दिल्यानंतर पुणे पोलिसांच्या ‘मनुष्य मिसिंग सेल’ने या मुलीचा तातडीने शोध घेऊन तिला पालकांकडे सुखरूप सुपूर्त केले. यासारख्या गुन्ह्यांसह बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून समांतर तपासाचा अवलंब केला जात आहे. मिसिंग सेलच्या माध्यमातून पोलिसांनी मागील वर्षभरात १७०० जणांचा शोध घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिस ठाण्यांमधील दैनंदिन कामाच्या ताणामुळे हरवलेल्या व्यक्तींचा तपास करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे या तपासाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार फिर्याद देणाऱ्यांकडून होत होती. त्याची पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दखल घेत हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांनी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागांतर्गत ‘मनुष्य मिसिंग सेल’ची स्थापना केली. कोणताही मोठा गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जातो. या पद्धतीचा उपयोग हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठीदेखील करण्याचे निश्‍चित झाले. 

हरवलेल्या व्यक्तींबाबत शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्याचा समांतर पद्धतीने तपास करण्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळे काही दिवसांमध्ये संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिस यशस्वी होत आहेत. २०१९ या वर्षामध्ये ३२८६ इतक्‍या व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. मिसिंग सेलने त्यापैकी १६५२ जणांचा शोध घेतला आहे. तसेच, गेल्या जानेवारी महिन्यात ४९ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून, या सर्वांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केले आहे. तसेच मिसिंग सेलकूडन संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशनही केले जात आहे.

बेपत्तामध्ये ७० टक्के मुली
पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या बेपत्ता तक्रारींपैकी ६० ते ७० टक्के तक्रारी १८ ते ३० या वयोगटांतील मुलांच्या प्रेमप्रकरणाशी संबंधित असतात. त्यामध्ये अल्पवयीन मुली, तरुणींचे प्रमाण जास्त आहे. अशा प्रकरणांमध्ये मुलींचा तत्काळ शोध घेऊन, मुली व त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. तसेच, मुलींना त्रास देणाऱ्यांना पोलिसी खाक्‍याही दाखविला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घराशेजारील तरुणाने माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेले होते. त्याविषयी तक्रार दिल्यानंतर मिसिंग सेलने दुसऱ्याच दिवशी मुलीचा शोध घेऊन तिला आमच्याकडे सुपूर्त केले. 
- संबंधित मुलीचे वडील 

‘मनुष्य मिसिंग सेल’च्या माध्यमातून समांतर तपास करून हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातो. बेपत्ता झालेली व्यक्ती परत मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त होत आहे. 
- अशोक मोराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have searched through Missing Cell 1700 people last year