पासपोर्टसाठी पोलिस आले घरी

अनिल सावळे - @AnilSawale
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पोलिसांनी दीड तासापूर्वी फोनवरून माझ्याशी संपर्क केला. त्यानंतर मी आणि माझे शेजारी घरी थांबलो. अवघ्या २० मिनिटांत पोलिसांनी पासपोर्ट पडताळणीचे काम पूर्ण केले.
- बुराउदीन पत्रावाला

नागरिकांना सुखद अनुभव; टॅबमुळे कामाचा वेग अधिक, यंत्रणा वाढविण्याची गरज  
पुणे - पोलिस व्हेरिफिकेशनसाठी घरी येत आहोत, कागदपत्रे तयार ठेवा... असे अर्जदारास कळवून घरी जायचं... टॅबद्वारे फोटो क्‍लिक करायचे... कागदपत्रे स्कॅनिंग केली की व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण... काही सोसायट्यांमध्ये टॅबला रेंज मिळत नाही... कधी कागदपत्रे अपूर्ण असतात... पुन्हा या म्हणून सांगितले जाते; तर कधी घरी पुरुष मंडळी नाहीत, नंतर या, असे उत्तर मिळते. त्यामुळे पूर्वी नागरिकांना पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारावे लागत असत; परंतु आता पोलिसांना नागरिकांच्या घरी पडताळणीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे मात्र नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

पोलिस ठाण्यात दररोज साधारण ५० अर्ज येतात. एका ठिकाणी बसून दिवसभरात ४० अर्ज निकाली काढणे शक्‍य होते. आता सकाळी साडेदहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत घरी जाऊन १७ अर्जदारांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले जाते. सुरवातीला अडचणी येत आहेत; पण व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेला गती येईल, अशी प्रतिक्रिया पोलिस ठाण्यातील पासपोर्ट विभागातील कर्मचाऱ्यांची आहे. 

पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन करण्यास नागरिकांचा बराच वेळ जातो. त्यामुळे पोलिस आयुक्‍तालय आणि पासपोर्ट विभागाच्या वतीने एम-पासपोर्ट सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली. अशी सुविधा देणारे पश्‍चिम भारतात पुणे एकमेव शहर आहे. या सुविधेमुळे नेमके काय परिणाम झाले, याबाबत ‘सकाळ’ने काही पोलिस ठाणी आणि नागरिकांशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
 

स्वखर्चानेच हेलपाटे 
कोथरूड ः कोथरूड पोलिस ठाण्यात पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. नागरिक आणि पोलिसांची भेटण्याची वेळ चुकते. आता नागरिकांऐवजी पोलिसांना घरी हेलपाटे मारावे लागत आहेत.गेल्या दोन दिवसांत कोथरूड पोलिस ठाण्यात ३० नागरिकांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यात आले. 

टॅबमुळे कामाचे प्रमाण वाढले 
विश्रांतवाडी - विश्रांतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम गतीने सुरू आहे. पोलिस नाईक यू. जे. घट म्हणाले, दररोज साधारण आठ-दहा जणांचे व्हेरिफिकेशन होते. पण टॅबमुळे हे प्रमाण वाढले आहे. नोकरदार व्यक्ती कार्यालयीन वेळेत घरी मिळत नाहीत. त्यांना फोन किंवा मेसेज करून त्यांची वेळ घेऊन जावे लागते. 

पडताळणीला वेग 
येरवडा - एम-पासपोर्ट प्रणालीमुळे दररोज पंधरा ते वीस जणांची पोलिस पडताळणी तीन दिवसांत होत आहे. हे प्रमाण दोन दिवसांवर येईल. पोलिस ठाण्याची खर्चाची बचत होणार आहे. टॅबवर ‘फोर-जी’ची सेवा असल्यामुळे समस्या उद्भवत नाहीत, असे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अशोक कदम यांनी सांगितले.

चौकीनिहाय पडताळणी व्हावी 
कात्रज - एम-पासपोर्ट सुविधेमुळे पोलिस ठाण्यातील गर्दी संपुष्टात आल्याचे चित्र भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पाहायला मिळाले. पोलिस निरीक्षक श्रीकांत शिंदे म्हणाले, ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून, नागरिकांच्या सुविधेसाठी चौकीनिहाय पडताळणी व्यवस्था उभी करावी लागेल. 

टॅबची प्रतीक्षा  
बिबवेवाडी - टॅब मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना अजूनही पोलिस ठाण्यातच यावे लागत आहे. सध्या केवळ ज्येष्ठ नागरिकांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन घरी जाऊन करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी दिली.

एकच टॅब
हडपसर - हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्यासाठी आयुक्तालयाकडून प्रत्येकी एक टॅब उपलब्ध झाला आहे. वानवडी पोलिस ठाण्यात घरी जाऊन केवळ सहा अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे, तर हडपसर पोलिस ठाण्याकडून एकही अर्ज घरी जाऊन पडताळणी करण्यात आलेला नाही.

Web Title: police home for passport