बारामतीचे पोलिस कर्मचारी बाळासाहेब भोई यांना राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

बारामती येथील उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस कर्मचारी बाळासाहेब भोई यांना पोलिस खात्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

बारामती : येथील उपविभागीय पोलिस अधिका-यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस कर्मचारी बाळासाहेब भोई यांना पोलिस खात्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. या पथकातील राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे भोई तिसरे पोलिस कर्मचारी ठरले आहेत. या पूर्वी अनिल जाधव आणि अशोक पाटील या दोघांना या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. बारामतीचे सहायक फौजदार दत्तात्रय चौधर यांनाही गेल्या वर्षी राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे. 

सन 1988 पासून पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या बाळासाहेब भोई यांनी आपल्या 31 वर्षांच्या सेवेत अनेक प्रकरणात क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली आहे. विश्वास नांगरे पाटील पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक असताना उकल न झालेल्या खून प्रकरणांच्या तपासासाठी निर्माण केलेल्या पथकात बाळासाहेब भोई यांनी तब्बल 14 खून प्रकरणांचा बारकाईने तपास करुन उलगडा केला होता. या शिवाय बारामतीतील मनीषा कर्नाळे खून प्रकरणासह वडगावला झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपींपर्यंत भोई आपल्या कौशल्याने पोहोचले होते.

अत्यंत धाडसी पोलिस कर्मचारी म्हणून त्यांची ख्याती आहे. तर आतापर्यंत सहाशेहून अधिक पारितोषिके त्यांना प्राप्त झालेली आहेत. गुन्हेगारांच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात भोई यांचा हातखंडा आहे. त्यांनी प्रदीर्घ काळ केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्याचा निर्णय झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officer of Baramati Balasaheb Bhoi to get presidential award