कोथरूडच्या उपनिरीक्षकासह पाच पोलिस बडतर्फ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; 66 लाखांच्या नोटा जप्त, मात्र दाखविले 20 लाख

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; 66 लाखांच्या नोटा जप्त, मात्र दाखविले 20 लाख
पुणे - कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत कोथरूड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी याबाबत आदेश दिले. कोथरूड पोलिसांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या 66 लाख रुपयांच्या चलनी नोटा जप्त केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात रेकॉर्डवर 20 लाख रुपयेच जप्त केल्याचे दाखविले होते.

पोलिस उपनिरीक्षक विक्रम प्रतापसिंग राजपूत, पोलिस हवालदार हेमंत मधुकर हेंद्रे, पोलिस नाईक अजिनाथ साहेबराव शिरसाट, कर्मचारी अश्‍वजित बाळासाहेब सोनवणे आणि संदीप झुंबर रिटे अशी बडतर्फ पोलिसांची नावे आहेत.

कोथरूड पोलिसांनी दोन फेब्रुवारी रोजी काही व्यापाऱ्यांकडून चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या 66 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या; परंतु केवळ 20 लाख रुपयेच जप्त केल्याची स्टेशन डायरीत नोंद केली होती. हे प्रकरण तीन आठवडे प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवण्यात आले होते. एका व्यापाऱ्याने प्रसारमाध्यमांना मुलाखत देऊन प्रकरणाचा खुलासा केला होता, त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती.

पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचे जबाब नोंदविले. चौकशीत हे प्रकरण गंभीर असल्याचे आढळून आले. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 (2), (बी) मधील तरतुदीनुसार एका उपनिरीक्षकासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांना, तर अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप देशपांडे यांनी उर्वरित चार पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याबाबत आदेश जारी केला. या कारवाईचा शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धसका घेतला आहे.

Web Title: police officer & five police suspend