Video : 'लेकराबाळांना घेऊन पायी जाऊ नका'; कामगारांच्या पाठीशी उभे राहिले पोलिस अधिकारी!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधून कामगारांचे अक्षरशः लोंढे पायी रस्त्याने, लोहमार्गावरुन जातान दिसत आहेत.

पुणे : अवघ्या सहा महिन्यांचे बाळ कडेवर घेऊन निघालेली एक आई, तिच्या बरोबर दमलेल्या अवस्थेतच पाठीवर सॅक, पिशवी लावून जड पावलांनी चालणारी पाच-सहा वर्षांची दोन मुले, डोईवर गाठोडी घेतलेल्या दोन मुली आणि संसाराचे पोतभर ओझे डोक्‍यावर घेतलेला बाप. खराडी येथून पायी बालेवाडीला व तेथून झारखंडला निघाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

येरवड्याजवळील अंधाऱ्या रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या या कुटुंबाला पाहून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची लाल दिव्याची गाडी थांबली. कामगार कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत गाडीकडे पाहू लागले. गाडीतुन पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे उतरले. त्यांनी कुटुंबाशी संवाद साधून त्यांनी "तुम्ही लेकराबाळांना घेऊन पायी जाऊ नका, जेवण घ्या, आराम करा, आम्ही तुमच्या जाण्याची व्यवस्था करतो', असा संवाद साधत त्यांना हात जोडून विनंती केली.

आणखी वाचा - पुणेकरांनो घरात औषधांचा पुरेसा साठा ठेवा; कारण...

या प्रसंगाने गहिवरलेल्या पती-पत्नीनेही त्यांना हात जोडले. या पद्धतीने गावाकडे पायी निघालेल्या तब्बल 405 कामगार कुटुंबांना पोलिस आयुक्तांपासून ते पोलिस उपायुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी आसरा अन्‌ आधार देत त्यांची पाठवणी केली. त्याचबरोबर संवेदनशील पोलिसांनी आत्तापर्यंत तब्बल 25 हजार परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी सुखरुप पोचविण्यासाठी मदतीचा हात दिला.

राज्यातील व परराज्यातील कामगगारांना त्यांच्या गावी पाठविण्यास केंद्र व राज्य सरकारने मंजुरी दिली, त्या दिवसापासूनच पुणे पोलिस रात्रंदिवस पुण्यात अडकलेले कामगार, विद्यार्थी, पर्यटक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा सगळ्या घटकांना योग्य त्या वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना परवानगी देत आहे. केवळ पोलिस कर्मचारी, पोलिस निरीक्षकच नव्हे, तर पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांच्यासह अतिरीक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त यांची टिम रात्रंदिवस अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी धडपडत आहे. 

- 'जीडीपी'मधील प्रबळ दावेदार असणाऱ्या सेवा क्षेत्राला हवे 'आर ऍन्ड डी'चे बूस्टर!

संवेदनशील मन आणि तितकेच उत्तम नियोजन
मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमधून कामगारांचे अक्षरशः लोंढे पायी रस्त्याने, लोहमार्गावरुन जातान दिसत आहेत. अनेक ठिकाणी बस स्थानके, रेल्वे अशा ठिकाणी गर्दी होऊन गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे. मात्र पुण्यात असे चित्र नाही, याविषयी पोलिस सहआयुक्त डॉ.शिसवे म्हणाले, "केवळ आत्ता नाही, तर आम्ही मागील दोन महिन्यांपासून पुण्यातून पायी परराज्यात, महाराष्ट्रात निघालेल्या कामगारांना ठिकठिकाणी थांबवले. त्यांची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केली. त्यांच्या वृद्ध, मुलांचे औषधोपचार केले.त्यांना धीर दिला. त्यामुळे हजारो लोकांशी आम्ही जोडलो गेलो होतो. ही माणसे आपल्याच कुटुंबातील आहेत, या भावनेने आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी त्यांच्याशी वागत होती. त्यामुळे त्यातील बहुतांश लोकांनी पायी जाण्याचे टाळले.''

Image may contain: one or more people

- मल्ल्याची शेवटची याचिकाही ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली; महिनाभरात भारताच्या ताब्यात?

मानसिक आधार अन्‌ परतीचा सुखरुप प्रवास
पुण्यात अडकलेल्या नागरीकांना परत पाठविण्यासाठी आवश्‍यक वैद्यकीय प्रमाणपत्रे, पोलिसांची परवानगी, त्यांचे समुह प्रमुख ठरविण्यापासून अनेक महत्वाची कामे पोलिसांनी केली. तसेच दोन महिने सगळ्या कुटुंबांना सांभाळल्याने त्यांचा पोलिसांवरील विश्‍वास वाढला. त्यामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी पोलिसांनीच पुढाकार घेतल्याचे डॉ.शिसवे यांनी सांगितले. कामगारांना कमी दरात किंवा मोफत प्रवास व्हावा, यासाठी खासगी बस संघटनांशी बोलणे सुरू केले. आत्तापर्यंत अडीचहे बसद्वारे हजारो नागरीकांना त्यांच्या राज्यात पोचविले. तर एसटीद्वारे त्यांना राज्याच्या सीमांपर्यंत मोफत पोचविले. पोलिस ठाण्यांपासून बसने रेल्वे स्थानकापर्यंत. तेथून कुठलाही गोंधळ, गडबड न करता रेल्वेत बसवून दिले. त्यांना जेवण, नाश्‍ता, पाण्याच्या बाटल्या, सॅनिटायझर, मास्क, बिस्कीटचे पुडे देऊन त्यांची पाठवणी केल्याचे डॉ.शिसवे यांनी सांगितले.

- छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूर ग्रामस्थांकडून अशा प्रकारे अभिवादन...

पायी जाणाऱ्या 405 कुटुंबांची घेतली काळजी
शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरत असताना पोलिस आयुक्तांपासून, सहपोलिस आयुक्त, अतिरीक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त अशा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तब्बल 405 कुटुंबांना अडविले. त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांना गावी पाठवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्याबरोबर त्यांना गावी जाण्यासाठी बस व्यवस्था करून दिल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officers give support to 405 working families who migrate from Pune