तक्रारींसाठी पोलिस प्राधिकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पुणे - तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले आदी विविध प्रकारच्या तक्रारी ‘विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणा’त नागरिकांना करता येणार आहेत. तक्रार केल्यावर स्वतःची बाजू नागरिक स्वतः मांडू शकतात. त्यासाठी वकीलही नियुक्त करण्याची गरज नाही. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे. 

पोलिसांच्या वर्तनाबद्दल आणि तपासाबद्दल नागरिकांच्या तक्रारी असतात. अनेकदा पोलिस आयुक्त किंवा अधीक्षक स्तरावर त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे न्यायालयात तक्रार करण्याशिवाय नागरिकांसमोर पर्याय राहत नाहीत. परंतु, ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात तीन ठिकाणी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण स्थापन केले आहे. त्यात पुण्यातील प्राधिकरण एक वर्षापूर्वी कार्यान्वित झाले आहे. या प्राधिकरणाचा पहिला निकाल २५ एप्रिलच्या ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्राधिकरणाने राज्य सरकार व पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना केली आहे. 

पोलिसांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राधिकरणात नागरिकांना करता येईल. त्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यात तक्रार सिद्ध करण्यासाठी पुरेसे तपशील आवश्‍यक आहेत. प्राधिकरणात निवृत्त न्यायाधीश रमेश जोशी यांची अध्यक्ष म्हणून तर निवृत्त अतिरिक्त पोलिस आयुक्त चंद्रकांत कुंभार आणि शहर पोलिस दलातील मुख्यालय विभागाचे उपायुक्त यांची पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पदसिद्ध सचिव असतील. या प्राधिकरणात पुणे शहर व जिल्हा पोलिस, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सर्व प्रकारच्या पोलिस आस्थापनांबाबत तक्रार करता येईल. त्यामुळे सीआयडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदींविरुद्धही नागरिकांना येथे दाद मागता येईल. संबंधित तक्रारीची पडताळणी करून प्राधिकरण निकाल देणार आहे. त्या निकालात राज्य सरकार किंवा संबंधित पोलिस आयुक्त, अधीक्षकांना कारवाईची शिफारस प्राधिकरण करेल.

येथे आहे पोलिस तक्रार प्राधिकरण 
‘अनंत हाईट्‌स’ १ ला मजला, जाधवनगर, सर्व्हे क्रमांक २९-२-१, नांदेड सिटीजवळ, नांदेड फाट्याशेजारी सिंहगड रस्ता, पुणे ४११०६८ (दूरध्वनी क्र. २४३८००७४ - वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच) 

Web Title: police pradhikaran for complaint