पोलिस कर्मचाऱ्यांनीच जप्त केलेली वाळू विकली

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 4 जुलै 2018

दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातच्या समादेशक कार्यालयाशेजारील बंदिस्त जागेतून काही पोलिस कर्मचार्यांनी जप्त केलेली वाळू चोरून विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि वाळू भरलेली ट्रॅाली दौंड पोलिसांनी जप्त केली आहे.

दौंड (पुणे) - दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातच्या समादेशक कार्यालयाशेजारील बंदिस्त जागेतून काही पोलिस कर्मचार्यांनी जप्त केलेली वाळू चोरून विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि वाळू भरलेली ट्रॅाली दौंड पोलिसांनी जप्त केली आहे.

दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि यवत (ता. दौंड) येथील विश्रामगृह आवारातून काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जप्त केलेले वाळूसह ट्रक व ट्रॅक्टर चोरीस जाण्याचे प्रमाण वाढल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून सदर वाहने राज्य राखीव पोलिस दलाच्या आवारात ठेवण्यात आली होती. परंतु ज्यांच्यावर वाळू व सदर वाहनांच्या रक्षणाची जबाबदारी होती त्यांनीच सदर वाळू विकल्याचा दुर्देवी प्रकार उघडकीस आला आहे. 

दौंड शहरातील कुरकुंभ रस्त्यावरील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातच्या समादेशक कार्यालयाशेजारी मंगळवारी (ता. 3) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. महसूल खात्याने तालुक्यात वाळूचोरी प्रकरणी जप्त केलेली वाळू आणि वाहने राज्य राखीव पोलिस दलाच्या ताब्यात दिली होती. काल रात्री रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)चे पदाधिकारी प्रकाश भालेराव व त्यांचे सहकारी अभिजीत ऊबाळे हे भोईटेनगर येथून जात असताना त्यांना राज्य राखीव पोलिस दलाचा एक साध्या वेशातील कर्मचारी वाळू असलेल्या ट्रॅक्टर चालवत होता व त्याच्यासमवेत त्याचा सहकारी होता. दोघांनी सदर वाळू भोईटेनगर येथील मारूती मंदिराजवळ बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खाली केली. त्यानंतर पाठीमागून आणखी एक वाळू असलेला विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आला व त्यामध्ये देखील राज्य राखीव पोलिस दलाचे कर्मचारी असल्याने भालेराव यांनी ट्रॅक्टर थांबवून विचारणा करताच दोन्ही पोलिस कर्मचार्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढला.

भालेराव यांनी दौंड पोलिसांना हा प्रकार कळविल्यानंतर सहायक फौजदार सुर्यवंशी शासकीय जीप मधून घटनास्थळी आले व त्यांनी एका खासगी चालकाच्या साह्याने एक ट्रॅक्टर आणि वाळू भरलेली ट्रॅाली पोलिस ठाण्याच्या बाहेर लावली. पळून गेलेल्या कर्मचार्यांपैकी एकाची नियुक्ती एसआरपीएफच्या गॅस गोदामात असल्याची माहिती तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे. सरकारी वाळू चोरून त्याची परस्पर विक्री करणार्यांवर कारवाईची मागणी तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे.

राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेश कार्यालयाजवळून वाळूची चोरी करून त्याची विक्री होत असताना समादेशक कार्यालय, अॅक्सिस बॅंक एटीएम गेट, मोटार परिवहन विभाग आणि अन्य प्रवेशद्वारांवर नियुक्त सशस्त्र पोलिस शिपायांपैकी कोणीही सदर वाहने अडविली नाही. त्याचबरोबर राज्य राखीव पोलिस दलाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी नियुक्त लाइन पोलिस (एल. पी.) व गस्त पथकाने देखील वाळू चोरणार्या कर्मचार्यांना न रोखल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महसूल खात्याने राज्य राखीव पोलिस दलाच्या ताब्यात जप्त करून दिलेली वाळू चोरी जाण्यासह काही विना क्रमांकाचे ट्रॅ्क्टर देखील परस्पर विकण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक सातचे समादेशक तथा भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्रीकांत पाठक यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले की, पोलिसांचा माझ्याकडे अद्याप अहवाल आलेला नाही. अहवाल आल्यावर मी पाहीन.

Web Title: Police sold seized sand